महत्वाच्या बातम्या

 वृद्ध, विधवा, दिव्यांग, अनाथ, परितक्त्यांना संजय गांधी योजनेचा आधार


- आर्वी येथे सामाजिक सहाय्य योजनांची जनजागृती

- माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : समाजातील विविध घटकांसाठी संजय गांधी योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येते. दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा, अविवाहित महिला, परितक्त्या, अनाथ मुलांसाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरल्या आहे. आर्वी येथे गणोशोत्सवात या योजनांची जनजागृती करण्यात आली. विविध शासकीय योजना गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्टेशन वार्ड आर्वी येथील शिवशक्ती गणेश मंडळ येथे संजय गांधी योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, मंडळाचे अध्यक्ष डॉ.विनय देशपांडे, अनील जोशी, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, आर्वी तहसिलचे महसूल सहाय्यक धर्मेद्र बाळसराफ आदी उपस्थित होते. ६५ वर्षावरील वृद्ध, महिला व पुरुष, विधवा, अविवाहीत महिला, परितक्त्या, घटस्फोटीत महिला, दिव्यांग, १८ वर्षाआतील अनाथ मुले व मुली इत्यादींसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन व दारिद्रय रेषेखालील व्यक्तींकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत दिव्यांग व्यतिरिक्त इतर सर्व लाभार्थ्यांना दरमहा अनुदान १ हजार ५०० रुपये  तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रुपये त्यांच्या आधारलिंग बँक खात्यात डीबीटीद्वारे शासनस्तरावरुन वितरीत करण्यात येते. या योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र लाभार्थ्यांनी तसेच दिव्यांग महिला व पुरुषांनी घ्यावा, असे आवाहन लोकसंवाद कार्यक्रमातून तहसिल कार्यालय आर्वीच्याच्यावतीने करण्यात आले.

वृद्ध, विधवा, दिव्यांग, अनाथ व परितक्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय योजनेंतर्गत तहसिल कार्यालयामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अनुदान आता दरमहा १ हजार ५०० वरुन २ हजार ५०० करण्यात आले आहे, असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संजय गांधी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार दारिद्रय रेषेखालील असणे आवश्यक आहे. अर्जदार दिव्यांग असल्यास युडीआयडी कार्ड, विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यु प्रमाणपत्र, घटस्फोटीत असल्यास न्यायालयीन आवश्यक कागदपत्र, अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपात्र, अत्याचारीत महिला असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक, महिला व बाल विकास अधिकारी व पोलिस प्रमाणपत्र कागपदपत्रे आवश्यक असल्याचे महसूल सहाय्यक धर्मेद्र बाळसराफ यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवशक्ती गणेश मंडळाचे सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





  Print






Related Photos