उद्योग वाचले तर हजारो संसार सुरक्षित : खाकी च्या पहाऱ्यात औद्योगिक क्षेत्र, खंडणीखोरांना पोलिसांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : उद्योगांच्या भिंतींच्या आत केवळ यंत्रे आणि उत्पादन नसते, तर हजारो कामगारांचे संसार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे भविष्य जोडलेले असते. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांची सुरक्षा ही केवळ कंपनीची जबाबदारी नसून ती कायदा व सुव्यवस्थेचाही महत्त्वाचा भाग आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत चोरी, भंगार चोरी आणि कंपन्यांवर बेकायदेशीर दबाव आणणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.
तुकुम रोड येथील पोलीस सभागृहात पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षेबाबत विशेष आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापत्रे यांच्यासह रामनगर, दुर्गापूर व पडोली पोलीस ठाण्यांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सुमारे १०० कंपन्या, WCL तसेच विविध औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख व प्रतिनिधी बैठकीला सहभागी झाले. औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोरी आणि भंगार चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रंदिवस गस्त घालताना संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या.
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचाही बैठकीत गांभीर्याने विचार करण्यात आला. कामाच्या ठिकाणी एखादा दुर्दैवी अपघात झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका कामगाराच्या कुटुंबाला बसतो. त्यामुळे प्रत्येक कामगाराला विमा संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. धारिवाल कंपनीने बँक खाते उघडतानाच कामगारांना विमा सुविधा जोडल्याची, तर डालमिया सिमेंटने कामगारांना पहिल्याच दिवसापासून विमा संरक्षण दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
कामगारांच्या वाहतूक सुरक्षेकडेही पोलिसांनी लक्ष वेधले. हेल्मेटसह आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर न करणाऱ्या कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी औद्योगिक परिसरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहनचालना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, कंपन्यांवर बेकायदेशीर दबाव आणणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे. कामगारांना हाताशी धरून कंपनी व्यवस्थापनाला धमकावणे, अवैध आर्थिक मागण्या करणे किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणे सहन केला जाणार नाही. अशा प्रकारांची माहिती मिळताच कंपन्यांनी पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट केले.
ब्रह्मपुरी ओव्हरब्रिज परिसरातील वाहतूक कोंडीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. गरजेनुसार अतिरिक्त वाहतूक पोलीस कर्मचारी आणि बंदोबस्त तैनात करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उद्योगांची चाके अविरत फिरत राहण्यासाठी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. उद्योग सुरक्षित राहिले तर त्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबेही सुरक्षित राहतील, या भूमिकेतून पोलीस प्रशासन आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी केले, तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांनी मानले.




Petrol Price




