उत्कृष्ट कार्याबद्दल धनंजय दुम्पेट्टीवार यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेट्टीवार यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाजात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगरे तसेच उपशिक्षणाधिकारी संजीव पारसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे दुम्पेट्टीवार यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्कार समारंभाला प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक रायसिडाम, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, प्राथमिक शिक्षक समितीचे मार्गदर्शक धनपाल मिसार, जिल्हाध्यक्ष योगेश ढोरे, आशिष धात्रक यांची उपस्थिती होती.
तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, शिक्षक परिषदेचे साळवे, अविनाश तालापल्लीवार, गुरुदेव नवघडे, बापू मुनघाटे, राजकुमार घोडेस्वार, कोमरेवार, अनिल मुलकलवार, विजय बन्सोड यांच्यासह विस्तार अधिकारी संघटनेचे दीपक देवतळे व यशवंत टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय कामकाजात अधिकारी आणि शिक्षक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना सकारात्मक दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची दखल घेऊन दुम्पेट्टीवार यांचा गौरव करण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन केलेल्या या सत्कारामुळे शिक्षक संघटना आणि शिक्षण विभागातील समन्वयाला चालना देणारा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी धनंजय दुम्पेट्टीवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




Petrol Price




