महत्वाच्या बातम्या

 एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी केंद्राच्या समितीची उद्योगांना भेटी


- पुरस्कार पडताळणीसाठी वर्धा राज्यातील एकमेव जिल्हा

- देशभरातील १ हजार अर्जांपैकी केवळ ६४ अर्ज पात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाच्यावतीने यावर्षापासून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार दिले जाणार आहे. त्यासाठी संपुर्ण देशभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी शासनाने ठरविलेल्या निकषात राज्यातील केवळ वर्धा हा एकमेव जिल्हा पुरस्काराच्या पडताळणीसाठी पात्र ठरला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या पुरस्कार निवड समितीने जिल्ह्याला भेट देऊन विविध उद्योगांची पाहणी केली.

केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत राज्यातील ३६ जिल्ह्यांनी अर्ज सादर केले होते. अर्जासोबत विविध ५२ मुद्यांची प्रश्नावली सादर करावयाची होती. या अर्जातून प्रश्नावलीच्या आधारे केवळ वर्धा जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवड झाली आहे. देशभरातून १ हजार अर्जांपैकी केवळ ६४ अर्ज पुरस्काराच्या पडताळणीसाठी निवडल्या गेले आहे.

देशभर एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्याची खरी क्षमता ओळखणे, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मिती आणि ग्रामीण उद्योजकता, आत्मनिर्भरता या ध्येयाकडे नेण्यासाठी एक परिवर्तनाचे पाऊल म्हणून देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, त्याचे ब्रँडिंग व मार्केटिंग करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत यावर्षापासून केंद्र स्तरावर पुरस्कार दिले जाणार आहे. त्यासाठी देशातील सर्वच जिल्ह्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील प्राप्त अर्जातून निकषात केवळ वर्धा जिल्हा परिपुर्ण ठरल्याने राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या निवड समितीने जिल्ह्याला भेट देऊन पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील विविध उद्योगांची पाहणी केली. केंद्र शासनाच्या या पुरस्कार पडताळणी समितीतील नाव्या छाब्रा व स्मिती सक्सेना यांनी मे पी.व्ही. टेक्सटाईल्स प्रा.लि., मे श्यामबाबा ट्रेडर्स प्रा.लि., मे गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा.लि., अंकुर सिड्स, मगन संग्रहालय येथे खादी उत्पादन युनिट, तसेच कापसाच्या शेतीला भेट देऊन विविध उद्योजक, शेतकरी व कामगारांच्या भेटी घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेश जैन, कृषि उपसंचालक परमेश्वर घायतिडक, आदर्श मोहता, प्रशांत मोहता, भुपेश शहाणे, आयुष सिंघानिया, रितेश सुराणा, संतोष देशमुख, मुकेश लुताडे, जोसेफ, फुटाणे आदि उपस्थित होते. भेटी दरम्यान पडताळणी झालेल्या उद्योगांची निवड झाल्यास डिसेंबर महिन्यामध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

समिती सदस्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद -

समितीच्या सदस्यांसोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संवाद साधला. एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना अवगत करून दिली.





  Print






News - Wardha




Related Photos