शौचालयाच्या खड्ड्यात पडून साडेचार वर्षाच्या बालकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
घराच्या आवारामध्ये खेळत असताना अचानक शौचालय बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून साडेचार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल २९ जून  रोजी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास आरमोरी तालुक्यातील बोडधा येथे घडली. चैतन्य सुभाष किरंगे असे मृतक बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार  चैतन्य हा घराजवळील मुलांसोबत खेळत होता. घराच्या मागच्या भागाला शौचालयासाठी पाच फुटाचा खड्डा खोदण्यात आला होता.
दरम्यान खेळता-खेळता  चैतन्याचा तोल गेल्याने तो खड्ड्यात पडला. मात्र ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. दरम्यान आई- वडीलांनी आपला बाळ दिसत नसल्याचे लक्षात  येताच घराशेजारी व गावामध्ये शोधाशोध केली. त्याचा थांगपत्ता लागला नाही. मृतक चैतन्याच्या वडिलांनी घराच्या मागील भागात  २ महिन्या पुर्वी शौचालयासाठी खड्डा खोदला होता. मात्र आता शेतीचा हंगाम आल्यामुळे शौचालयाचा काम ठप्प होते. दरम्यान शोधाशोध केली असता  चैतन्य खड्ड्यात पडल्याचे आढळून आले. लगेच त्याला वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात भरती करण्यात  आले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-30


Related Photos