अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास


- विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली 
: मैत्रीणीसोबत शाळेत जात असताना अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. आशिष मधुकर मेश्राम (२२) रा. नगरी, ता. जि. गडचिरोली असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
११ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी ही आपल्या मैत्रीणीसोबत शाळेत जात असताना आरोपी आशिष मधुकर मेश्राम याने मोटारसायकलने येवून पीडित मुलीचा हात पकडून मोटारसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सोबत असलेल्या मैत्रीणीने पीडितेस मदत करून बसस्टँडकडे निघुन गेले. तेव्हा आरोपीही बसस्टॅन्डजवळ येवून तिच्यासोबत दोन मित्रांना घेऊन पीडितेला इशारा करीत होता. याबाबत पीडितने शेजारी काम करीत असलेल्या शेतकऱ्याला सांगितले. शाळेतून घरी परत आल्यानंतर घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितला. त्यावरून १२ ऑक्टोबर २०१७ रोजी पीडितेच्या कुटुंबियांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. 
न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे  साक्षदारांचे बयाण नोंदवून व युक्तीवाद ग्राह्य धरून आज १७ जून रोेजी आरोपीस कलम २५४ अ व कलम ३५४ ड भादंवि तसेच कलम ८ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये दोषी ठरवून आरोपी आशिष मेश्राम यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिल प्रधान यांनी तर  कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-17


Related Photos