सीआरपीएफ जवानांच्या गस्तीपथकावर दहशतवाद्यांचा हल्ला , ५ जवान शहीद


वृत्तसंस्था / अनंतनाग :  दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात के. पी. रोडवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील निरीक्षकाचाही समावेश आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ जवानांच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी अचानक लक्ष्य केले. अत्याधुनिक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच दहशतवाद्यांनी ग्रेनेडही फेकले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना उपचारांदरम्यान वीरमरण आलं असून अन्य जखमींना उपचारांसाठी श्रीनगर येथे हलवण्यात आलं आहे. 
दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. पोलीस व सीआरपीएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत यातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. सध्या या भागात दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. 
दरम्यान, एक स्थानिक मुलगीही जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.  अल उमर मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे वृत्त काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दिले आहे. मुश्ताक जरगर या संघटनेचा म्होरक्या आहे. बालाकोट हवाई हल्ल्यात जरगरही निशाण्यावर होता, असे सांगितले जाते. १९९९ मध्ये आयसी- ८१४ या अपहृत विमानातील ओलीस प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारताने ज्या दहशतवाद्यांना सोडले होते त्यात जरगरचाही समावेश होता. 

   Print


News - World | Posted : 2019-06-12


Related Photos