कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी शरद कळसकरला अटक


वृत्तसंस्था / मुंबई : कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला  मंगळवारी  एसआयटीच्या विशेष पथकाने अटक केली. पानसरे हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेला तो नववा आरोपी आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकर याचे नाव पुढे आले होते.मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने त्याला गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये याप्रकरणी अटक केली होती. त्याचवेळी त्याचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.त्याचा ताबा घेण्यासाठी कोल्हापुरातील एसआयटीकडून प्रयत्न सुरू होते.  वैभव राऊतसह पाच जणांचा ताबा घेऊन त्यांचे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील धागेदोरे शोधले जात होते. संशयितांकडे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शस्त्र मिळाल्याने पानसरे हत्येबाबत काही धागे हाती पडतील,असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले होते.  मध्यंतरी,वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, सचिन अंदुरे हे पाच संशयित मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस कोठडीत  आहेत. या संशयितांपैकी शरद कळसकर याने काही काळ कोल्हापुरात वास्तव्य केले होते. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांशी त्याचे निकटचे संबंध राहिले. कळसकरच्या चौकशीतून पानसरे हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली गेली होती.आता तो पोलीस कोठडीत आल्याने त्याच्याकडून पानसरे हत्येबाबतची महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-06-11


Related Photos