महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यात संधीचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- कृषिमाल निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठीच निर्यात व्यवस्थापनासारखे प्रशिक्षण सातत्याने दिले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. समृध्दी महामार्गामुळे शेतमाल पोर्टपर्यंत पोहोचविण्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाल्याने निर्यातीच्या संधीत वाढ झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय कृषिमाल निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, सहकार विकास महामंडळाचे प्रशिक्षण विभाग प्रमुख दिगंबर साबळे, प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप उपस्थित होते. 

कृषी मालाची निर्यात करण्यासाठी मुंबई किंवा हैदराबाद पोर्टला माल पाठवणे खूप अडचणीचे होते. समृद्धी महामार्गामुळे आठ ते दहा तासात माल मुंबई पोर्टला पोहोचून दुसऱ्या दिवशी तो परकीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध होऊ शकतो. सिंदी येथे होणाऱ्या ड्रायपोर्टमुळे कंटेनरची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्धता होणार आहे. त्यामुळे निर्यात व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या संधीचा युवकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले.

निर्यातीच्या बारकाव्यांचा अभ्यास केला तर कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती निर्यात करू शकतो. परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांच्या गरजा ओळखून आपण कोणत्याही मालाची निर्यात करू शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कृषीमालच पाठवावा असे बंधन नाही. शेतकऱ्याने वैयक्तिक निर्यात न करता समूहाने एकत्रितरित्या येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून निर्यात केली तर शेतकरी यशस्वी होऊ शकतात. नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची उलाढाल जवळपास १ हजार कोटीच्या वर असल्याचे दिगंबर साबळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांकडे वळावे व hortnet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, जेणेकरून जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या निर्यातक्षम मालाची माहिती निर्यातदारांना मिळू शकेल, असे श्री.शिवणकर यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार हेमंत जगताप यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी भोलनकर, मयूर पवार, युवराज खोपडे यांचे सहकार्य लाभले.





  Print






News - Wardha




Related Photos