महत्वाच्या बातम्या

 कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजे हरिहरांचे मीलन


- आज ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे. त्या निमित्ताने हरिहरांचे मीलन 

कार्तिक शुक्ल चतुर्दशी हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नावाने प्रसिद्ध आहे. या दिवशी श्रीविष्णु आणि श्री शंकर यांची भेट झाल्याचे पुराणग्रंथांत नमूद आहे. सनतकुमार संहितेत अशी कथा आहे की, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्री आले आणि मणिकर्णिकेत स्नान करून त्यांनी काशीविश्वेश्वरास सहस्र कमळे वहाण्याचा संकल्प केला. पूजा चालू असतांना शंकराने एक कमळ दूर लोटून दिले.तेव्हा संकल्प पूर्ण करण्यासाठी विष्णूने त्या फुलाऐवजी स्वतःचे नेत्रकमळच अर्पण केले ! विष्णूच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. या कथेतील मर्म ध्यानी घेणे आवश्यक आहे. भारतात ऐतिहासिक कालापासून शिव आणि विष्णु या देवतांच्या उपासकांमध्ये मतभेद निर्माण होऊन द्वेष, मत्सर आदी दोष वाढू लागले. नंतरच्या काळात वीरशैव, वीरवैष्णव, लिंगायत, गाणपत्य, नाथपंथी, महानुभव, जैन, रामदासी, कापाळी, गोसावी, रामानंदी इत्यादी अनेक संप्रदाय निर्माण होऊन सर्वांच्या मुळाशी असलेला भारतीय संस्कृतीचा धागा लोक विसरून जाऊ लागले. या सर्व पंथांचे स्वरूप बाह्यदृष्टीने भिन्न असले, तरी एकजिनसी असणार्‍या आपल्याच संस्कृतीची ही भिन्न अंगे आहेत, असे पटवून देण्याचे जे काही उपक्रम झाले, त्यात वैकुंठ चतुर्दशीचे स्थान मोठे आहे. हरि-हर यांच्यात केवळ एका वेलांटीचा भेद आहे असाच उपदेश जगद्गुरु संत तुकोबांचा आहे.

शिव आणि विष्णुचे रूप : श्री विठ्ठल

उत्तरेत वा दक्षिणेत शैव आणि वैष्णव यांची भांडणे असली, तरी महाराष्ट्रात त्याचे नावही दिसून येत नाही. याचे श्रेय येथे रूढ झालेल्या भागवत धर्मास द्यायला पाहिजे. या भागवत धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्व मतभेद मिटवले अन् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम सांगतात, त्याप्रमाणे एकाच विठोबाला शिव आणि विष्णु यांच्या स्वरूपात पहाण्यास जनतेस शिकवले.

साभार : दिनविशेष, भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन , लेखक : प्रल्हाद नरहर जोशी





  Print






News - Editorial




Related Photos