विभागीय हँडबॉल स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा दिमाखदार विजय


- अंतिम सामन्यात नागपूर ग्रामीण संघाचा पराभव; विभागस्तरीय विजेतेपदासह राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा क्रीडा उपसंचालक, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोलीच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या शानदार विजयासह विद्यालयाच्या संघाने राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
विभागीय स्तरावरील या स्पर्धेत विविध संघ सहभागी झाले होते. अशा स्पर्धात्मक वातावरणात गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यादरम्यान खेळाडूंनी वेगवान आक्रमण, अचूक पासिंग, प्रभावी बचाव आणि योग्य सांघिक समन्वय साधत प्रतिस्पर्धी संघांसमोर आपले कौशल्य सिद्ध केले.
हँडबॉल हा वेग, शारीरिक क्षमता, चपळता, अचूकता आणि क्षणाक्षणाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचा कस पाहणारा खेळ आहे. या सर्व बाबींमध्ये विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघाकडून निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाताना खेळाडूंनी संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवला. मैदानावर प्रत्येक खेळाडूने आपल्या सहकाऱ्याला साथ देत संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
या यशामागे खेळाडूंची नियमित मेहनत, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि विजयाची जिद्द यांचा मोठा वाटा आहे. सामन्यातील प्रत्येक क्षणी खेळाडूंनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अंतिम सामन्यात नागपूर ग्रामीण संघाला धूळ चारीत विभागस्तरीय झेंडा रोवून राज्यस्तरावर झेप घेतली आहे.
या ऐतिहासिक कामगिरीत राहुल मडावी – कर्णधार, शिवम मडावी – उपकर्णधार, रुपेश मरापे, पवन बांगरे, सोहम गोटा, आयुष पोरेट, मोहित नरतम, प्रतीक आत्राम, सोहम कोराम, तेजस भांडेकर, प्रथम कुलमेथे, प्रेम कोवे, समर्थ भुरसे, भार्गव भांडेकर, मोहित रुखमोडे आणि सोहम कोरम या खेळाडूंचा समावेश आहे.
विभागीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर आता गोंडवाना सैनिकी विद्यालयाचा १४ वर्षांखालील हँडबॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. विद्यालयासाठी हा विजय विशेष अभिमानाची बाब असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्कृष्ट क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे या यशातून दिसून येते.
या उल्लेखनीय विजयाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे तसेच पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनीही विजयी संघाचे अभिनंदन करून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा विभाग आणि संपूर्ण विद्यालय परिवाराने या शानदार कामगिरीबद्दल खेळाडूंचे कौतुक केले.
खेळाडूंच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक प्रदीप राउत आणि क्रीडा प्रशिक्षकांचे भूपेंद्र सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव आणि योग्य नियोजन यांचाही महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे विजयी खेळाडूंसोबतच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक व क्रीडा प्रशिक्षकांचेही अभिनंदन करण्यात आले.




Petrol Price




