महत्वाच्या बातम्या

 शहीदांचा सन्मान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य : आ. डॉ. पंकज भोयर


- इंद्रप्रस्थ कॉलेजमध्ये मेरी माटी, मेरा देश कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलीदानामुळे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या कार्याची आठवण आपल्यामध्ये सतत तेवत असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक भारतीयाने शहीदांचा सन्मान करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. पंकज भोयर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त मेरी माटी, मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत परिसर व गावातून दुसऱ्या टप्प्यात अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. बुधवारी इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये अमृत कलश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.डॉ. पंकज भोयर यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाला जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अभियानाच्या नोडल अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, जयंत कावळे, आशिष कुचेवार, गिरीष कांबळे, माजी नगर परिषद सभापती निलेश किटे, माजी नगरसेवक अभिषेक त्रिवेदी, पवन राऊत, जगदीश टावरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विरू पांडे, सौरभ देशमुख, प्रवीण चोरे, प्राचार्य डॉ. आशिष ससनकर, महिला विकास संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत वेरूळकर, डॉ. हेमंत मिसाळ, डॉ. मदन इंगळे, डॉ. प्रशांत कडवे उपस्थित होते.

आ. डॉ. भोयर यांनी मेरी माटी, मेरा देश या अभियानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहीदांच्या कार्याची आठवण सतत होत रहावी व त्यांच्या ऋृणातून उतराई होण्यासाठी या अभियानाचा शुभारंभ केल्याचे सांगितले. अभियानांतर्गत गाव व परिसरातून माती व तांदुळ जमा केला जात आहे. ही माती तालुका व जिल्हा पातळीवर जमा केल्यानंतर मुंबई व त्यानंतर दिल्ली येथे पाठविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली येथे संपुर्ण देशातील माती जमा करून शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक तयार केल्या जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण दिल्या जाणार आहे. त्यामुळे महिलांना दोन्ही सभागृहात हक्काची जागा मिळणार असल्याचे आ. डॉ. भोयर यांनी सांगितले. यावेळी डॉ. ज्ञानदा फाणसे यांनी मेरी माटी, मेरा देश अभियानाची माहिती विद्यार्थ्यांना देत या अभियानात सर्वानी सहभागी होऊन आपल्या भागातील माती अमृत कलशामध्ये टाकण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos