महत्वाच्या बातम्या

 ६३० लिटर डिझेलची अवैध वाहतूक : कारसह ५.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-विसापूर बायपास मार्गावर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अवैधरित्या डिझेलची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ६३० लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ५ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक आमीर साबीर शाह २६ वर्ष रा. धौसंद पोस्ट भुजरख, जि. बांदा, उत्तर प्रदेश, सध्या रा. सास्ती, ता. राजुरा, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी बल्लारपूर-विसापूर बायपास मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी व मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई सुरू होती. यावेळी एमएच ३४ के ७११६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून डिझेलची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी क्रं एमएच ३४ के ७११६ कारमध्ये निळ्या, काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या एकूण १८ प्लास्टिक कॅन आढळून आले. प्रत्येक कॅनची क्षमता ३५ लिटर असून सर्व कॅनमध्ये मिळून सुमारे ६३० लिटर ज्वलनशील पदार्थ असल्याचे समोर आले.

पोलिसांनी कॅनची झाकणे उघडून तपासणी केली असता त्यातून डिझेलसदृश वास येत होता. चालकाकडे या ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवाना आहे का, अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता तसेच माल कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होता, याबाबत चालकाने समाधानकारक माहिती दिली नाही. या कारवाईत अंदाजे ६१ हजार ७४० रुपये किमतीचे ६३० लिटर डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ तसेच अंदाजे ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ५ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरोपी आमीर साबीर शाह याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ व २८७ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८९ मधील कलम २३० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ रामराव टेकाम,  पोलीस हवालदार राकेश मेंढे, राजु बगमारे, गजानन झाडे, नासिर अली,अजय खरकाटे, पोअं स्वप्नील खोब्रागडे, सौरभ मुन, प्रणय वानखेडे, मपोअं कल्याणी पाटील यांनी केले.





  Print






Related Photos