महत्वाच्या बातम्या

 विसर्जनाच्या मार्गात अडथळा : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा गेट मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विसर्जन मिरवणुकीतील कथित गैरव्यवस्थेमुळे मागील मंडळांना अडथळा निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने ही कारवाई केली.

२५ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरातील रामनगर, चंद्रपूर शहर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत ‘चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा गेट’ हे मंडळ सहभागी झाले होते. जटपुरा गेट परिसरात पोहोचल्यानंतर मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आल्याने मागून येणाऱ्या इतर गणेश मंडळांच्या मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर मंडळाला विसर्जन मार्गाकडे रवाना करण्यात आले.

मात्र, त्यानंतर मंडळाने विसर्जन न करता गणेशमूर्ती पुन्हा मंडपात नेऊन ठेवल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शहरातील सुमारे ५० सार्वजनिक गणेशमूर्तींच्या नियोजित विसर्जन मिरवणुका निघणार असताना, दुपारी सुमारे ४ वाजता प्रशासनाला पूर्वकल्पना न देता आणि परवानगी न घेता ‘चंद्रपूरचा राजा’ मंडळाने पुन्हा विसर्जन मिरवणूक काढल्याचा आरोप आहे.

या मिरवणुकीमुळे दवा बाजार, केवळराम चौक, रामसेतू पूल ते विसर्जन पॉईंट या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हा मार्ग रुग्णवाहिका, नागरिक आणि नियमित वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहतुकीला झालेल्या अडथळ्याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या.

विशेष म्हणजे, विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतरही सुमारे दोन ते तीन तास विसर्जनासाठी वेळ लागल्याने मागून आलेल्या इतर सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणाची रामनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मिरवणूक काढणे आणि विसर्जनास विलंब केल्याप्रकरणी पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा क्र. ११३६/२०२६ अन्वये संबंधित कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवात शिस्त, नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





  Print






Related Photos