‘मिशन शौर्य’ उपक्रमाअंतर्गत विदर्भातील सहा मुले बनली एव्हरेस्टवीर


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
‘मिशन शौर्य’ या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागाने यावर्षी निवड केलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी नऊ जणांनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट सर केला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यामध्ये विदर्भातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा जिवती येथील अंतुबाई कोटनाके, शासकीय आश्रमशाळा देवाडा येथील सुरज आडे, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेचा सुग्रीव मुंदे, बिजुधावडी येथील शासकीय आश्रमशाळेचा शिवचरण मिलावेकर, टेंभली येथील शासकीय आश्रमशाळेचा मुन्ना धिकार, तर यवतमाळ जिल्ह्यातील कापरा येथील शासकीय आश्रमशाळेची सुषमा मोरे या विदर्भातील सहा विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केला आहे. याशिवाय केतन जाधव (पालघर), अनिल कुंदे (नाशिक), हेमलता गायकवाड (नाशिक), मनोहर हीलिम (नाशिक) यांचाही या चमूमध्ये सहभाग होता. एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारे हे विद्यार्थी १८ ते २० वयोगटातील असून अकरावीमध्ये शिकत आहे. यशस्वीपणे एव्हरेस्ट सर करुन आता हे विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले आहे. 
मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य’मध्ये एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील दहा विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टकडे कूच केले होते. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळविले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कल्पनेतून ही योजना पुढे आली. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी ही कल्पना उचलून धरली व त्यानंतर मिशन शौर्य आता आदिवासी विकास विभागाचा एक अभिनव उपक्रम झाला आहे.  आदिवासी विकास विभागामार्फत या वर्षी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांचा सहभाग होता. चंद्रपूर, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला व कलागुणांना वाव देण्यासाठी मिशन शौर्य हे अतिशय पूरक ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच धर्तीवर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला चालना देण्यासाठी ‘मिशन शक्ती’ सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनात २०२४च्या ऑलिम्पिकसाठी मिशन शक्ती अंतर्गत निवडक क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना प्राविण्य दिले जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सलग यशाबद्दल आनंद व्यक्त होत आहे. या अभियानात याहीवर्षी चंद्रपूरच्या दोन मुलांनी यशस्वी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-27


Related Photos