नक्षल्यांनी गुरूपल्लीजवळ झाडे तोडून रस्ता अडविला, बॅनर बांधले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षल्यांनी आज १९ मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. बंददरम्यान नक्षल्यांनी रात्रीपासूनच हिंसक कारवाया सुरू केल्याचे दिसत आहे. एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्लीपासून काही अंतरावर नक्षल्यांनी काही दिवसांपूर्वी जाळपोळ केलेल्या ट्रक जवळ झाडे तोडून टाकली. बॅनर बांधून रस्ता अडविला आहे. सध्या रस्ता सुरळीत सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच भामरागड जवळील पर्लकोटा नदीजवळ बॅनर बांधले आहे.
नक्षल्यांनी झाडे तोडून रस्ता अडविलेल्या ठिकाणी बॅनर बांधले आहेत. या बॅनरवर २७ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीचा उल्लेख केला आहे. नक्षली कमांडर रामको नरोटे आणि शिल्पा धुर्वा यांना गुंडूरवाही येथे खोटी चकमक दाखवून सी - ६० पथकाने ठार केल्याचे बॅनरवर नमुद केले आहे. बॅनर मराठी भाषेतून असल्यामुळे हे कृत्य शहरी नक्षलवाद्यांचे असल्याचे बोलल्या जात आहे. बंददरम्यान नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे. अतिदुर्गम आणि सिमावर्ती भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नक्षल्यांच्या कृत्यामुळे दुर्गम भागातील विकासकामे ठप्प पडली आहेत.
News - Gadchiroli | Posted : 2019-05-19