महत्वाच्या बातम्या

 पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांची बापूकुटीला भेट


- जुन्या आठवणींना दिला उजाळा; बापूकुटीतील साहित्य व व्यवस्थापनाची स्थिती पाहून समाधान व्यक्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव तथा वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांनी आज सेवाग्राम येथील ऐतिहासिक बापूकुटीला भेट देऊन महात्मा गांधींच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा दिला. म्हैसकर हे यापूर्वी १९९९ ते २००३ या कालावधीत वर्धा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या काळात मंत्रीमहोदयांच्या वर्धा दौऱ्यादरम्यान सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीला भेट देण्याचा त्यांना अनेकदा योग आला होता. त्यामुळे आजच्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बापूकुटीतील जुने साहित्य, वस्तू तसेच तेथील व्यवस्थापनाची पाहणी केली. सुमारे दोन दशकांपूर्वी आपण पाहिलेल्या बापूकुटीतील साहित्य आणि व्यवस्थापनाची पद्धत आजही मोठ्या प्रमाणात त्याच स्वरूपात जतन करण्यात आल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

आश्रमाच्या इतिहासाची दिली माहिती -
यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे विजय तांबे यांनी पालक सचिव मिलिंद म्हैसकर यांना सेवाग्राम आश्रम तसेच बापूकुटीच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती दिली. बापूकुटीशी संबंधित विविध ऐतिहासिक संदर्भ, तेथील साहित्य आणि आश्रमातील जतन केलेल्या वस्तूंबाबतही त्यांनी माहिती दिली. महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे सेवाग्रामला ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. बापूकुटी ही या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, येथे येणाऱ्या अभ्यागतांना गांधीजींच्या जीवनशैलीची आणि विचारांची अनुभूती मिळते.

अधिकारी उपस्थित -
पालक सचिवांच्या या भेटीवेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, तहसीलदार संदीप पुंडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बापूकुटीला भेट देताना पालक सचिवांनी तेथील ऐतिहासिक वारशाचे जतन आणि व्यवस्थापनाबाबतही समाधान व्यक्त केले. त्यांच्या या भेटीमुळे सेवाग्राम आश्रमाच्या ऐतिहासिक महत्त्वाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला.





  Print






Related Photos