पूरपरिस्थिती दरम्यान सुरक्षित ठिकाणांची योग्यरित्या खातरजमा करावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली द्वारा आयोजिती मान्सून पूर्व आढावा बैठक आज  १३ मे रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पाडली.
सदर सभेस  जि. प. अध्यक्षा योगिता भांडेकर,  आपत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा, पुणे चे संचालक व्ही एन सुपणेकर,  जिल्हा पोलीस अधिक्षक  शैलेश बलकवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे , निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील  तसेच महसूल /आरोग्य / पोलीस / बांधकाम / पाटबंधारे / सिंचाई / महावितरण / दूरसंचार/परिवहन/पंचायत/नगरपालिका प्रशासनाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. कृष्णा रेड्डी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी बैठकीचे सादरीकरण केले.
गडचिरोली जिल्हा हा नद्यांचे विस्तृत जाळे असलेला भाग असून शिवाय नजीकच्या गोसेखुर्द, इटिया डोह, वर्धा प्रकल्प इ. धरणांमधून सोडणारे विसर्गाचे पाणी व अतिवृष्टी इत्यांदीमुळे वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पर्लकोटा, बांडिया इ. नद्यांना पूर येत असते. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५०२.३ मिमी असून पावसाळी पर्जन्यमान हे १३५४.७ मिमी एवढे आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, पूरपरिस्थिती असतांना वा अतिवृष्टी, नद्यांची पातळी वाढल्यामुळे पूराची संभाव्यता जाणवल्यास संबंधित भागातील शाळांना सुट्टी घोषित करणेसंदर्भात यापूर्वीच तहसिलदारांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावे. नदीच्या पुलावरुन  पाणी वाहत असतांना वाहतुकीला उचित प्रतिबंध घालण्यात यावे तसेच पुलाच्या दोन्ही बाजुला इशारा सूचनाफलके लावण्यात यावे. आपत्तीनिहाय हॉटस्पॉट्स ओळखून त्याप्रमाणे आवश्यक ठिकाणी संसाधनांची उपलब्धता करण्यात यावे. मान्सून कालावधीत गर्भवती स्त्रियांना उचित औषधोपचार मिळून योग्यवेळी दवाखान्यात भरती करणेसंदर्भात प्राधान्याने आराखडा बनविण्यात यावा. विद्युत पुरवठा अखंडीत ठेवणेसंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. पुलावरुन पाणी वाहत असतांना वाहतूक प्रतिबंधित करण्यात यावे. पावसाळयादरम्यान खंडीत गावातील तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा तात्काळ मिळावे तसेच पूरपरिस्थिती दरम्यान स्थलांतरीत करावयाचे सुरक्षित ठिकाणांची खातरजमा करण्यात यावी. केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावे. डीएम सेल द्वारा दिले जाणारे अलर्ट प्रत्येक गावापर्यंत दवंडीद्वारे देण्याची कार्यवाही महसूल व पंचायत विभागाद्वारे करण्यात यावे इ. निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. सर्व संबंधित विभागांचे नियंत्रण कक्ष हे २४ x ७ कार्यान्वित ठेवून जिल्हा नियंत्रण कक्षाशी सुससमन्वय साधावा.
संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणे म्हणाले की, कम्युनिटी बेस्ड आपत्ती व्यवस्थापन पथके तयार करुन त्यांचेमार्फत ग्रामपातळीवर कार्यवाही झाल्यास आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जलद प्रतिसाद शक्य होईल.
जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणाले, खाजगी डोंगा/बोट यांवर पावसाळ्यादरम्यान आवश्यक तो नियंत्रण ठेवण्यात यावा, पालन न झाल्यास वेळप्रसंगी यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावे तसेच दुर्गम भागात बसेसचे नियोजन योग्यप्रकारे करावे असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी स्वच्छता विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी यांना पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण तसेच पावसाळ्यादरम्यान खंडीत होणाऱ्या भागांमध्ये पुरेसा औषधांचा साठा आधीच करण्यासंदर्भात निर्देश दिले. तसेच पशुधनाकरिता आवश्यक औषधांचा साठा ठेवण्यासंदर्भात ही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-13


Related Photos