टेकडामोटला येथील कोंबडाबाजार आणि दारूविक्री थांबवा, महिलांचे पोलिसांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  सिरोंचा :
  तालुक्यातील टेकडामोटला या गावी कोंबडाबाजार भरतो. त्या दिवशी गावात गर्दी होत असल्याने दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परिणामी गावात भांडणतंटे होऊन याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळे हा कोंबडा बाजार आणि त्याआडून होणारी दारूविक्री थांबवावी अशी मागणी टेकडामोटला येथील महिलांनी निवेदनाद्वारे असरअली येथील पोलीस निरीक्षकांना केली.
   टेकडामोटला येथे मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविक्री बंद करण्यात आली आहे. असे असतानाही चोरून लपून दारूची विक्री केली जाते. त्यातच गावात कोंबडा बाजार भरतो. तो पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक मोठ्या संख्येने येतात. याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. पण दारूमुळे वाद विवादाचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे हा कोंबडा बाजार आणि त्याआडून होणारी दारूविक्री थांबवावी अशी मागणी येथील गाव संघटनेच्या महिलांनी आसरअली पोलिसांना केली.

नवऱ्याकडून महिलांना मारहाण

गाव संघटनेच्या महिला दारूविक्रेत्यांवर सतत पाळत ठेवून असतात. यामुळे टेकडामोटला येथे अनेकदा अहिंसक कृतीद्वारे दारूसाठे नष्ट करण्यात आले आहे. सोबतच पोलिसांकडूनही कारवाई केली जात आहे. संघटनेतील काही महिलांचे नवरे देखील दारू पीत असतात. पण विक्रेते त्यांना दारू देण्यास नकार देत असल्याने असे मद्यपी आपल्या बायकोला मारहाण करीत असल्याचे प्रकारही घडले आहे.

दारूविक्रेत्यांच्या घरावर लावले नोटीस   

बोराईगुडम या गावात दारूबंदीचा ठराव असतानाही दारूची विक्री होते. अनेकवार तक्रारी आणि अहिंसक कृती गाव संघटनेच्या महिलांनी केल्या आहेत. तरीही काही विक्रेते ऐकत नसल्याने मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती द्वारे विक्रेत्यांच्या घरी धाड मारली. यावेळी दोन विक्रेत्यांकडून दारू जप्त करण्यात आली. पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली. पोलिसांनी येऊन पंचनामा केला. संघटनेच्या महिलांनी एवढ्यावरच न थांबता गावातील शाळकरी मुले आणि विद्यार्थ्यांना घेऊन दारूबंदीसाठी गावात रँली काढली. याच दरम्यान दारूविक्री बंद करण्याबाबतचे नोटीस विक्रेत्यांच्या घरावरच लावले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-11


Related Photos