महत्वाच्या बातम्या

 आरमोरीत सुरक्षित बचपन अभियान : विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन


- तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभागाचा संयुक्त उपक्रम

- बालहक्क, बालसुरक्षा आणि सायबर सुरक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आरमोरी : बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षित बालपण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, आरमोरी आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत पोक्सो कायदा २०१२ विषयी राष्ट्रव्यापी शालेय जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले. २९ व ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आरमोरी येथील हितकारीणी विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय आणि डॉ. आंबेडकर विद्यालय येथे हा उपक्रम राबविण्यात आला.

या अभियानांतर्गत तिन्ही विद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी लागू असलेल्या पोक्सो कायदा २०१२ मधील तरतुदी, बालकांचे कायदेशीर अधिकार आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती, आरमोरीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आशिष जे. बोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या सहा प्रमुख संकल्पनांचे महत्त्व विशद केले. यामध्ये मेरा बचपन मेरा अधिकार, कानुन जानो बचपन बचावो, सुरक्षित क्लिक सुरक्षित बचपन, बोला बताओ बचाव, ना बालविवाह ना बाल शोषण आणि जागरुक बचपन सशक्त भारत या विषयांचा समावेश होता.

बालकांनी स्वतःच्या अधिकारांची जाणीव ठेवावी, कोणत्याही प्रकारच्या शोषणाविरोधात आवाज उठवावा, अडचणीच्या प्रसंगी विश्वासू व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, तसेच इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहायक सरकारी अभियोक्ता सुभाषचंद्र उईके यांनीही विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा २०१२ मधील महत्त्वाच्या तरतुदी आणि बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर उपाययोजनांची माहिती दिली. बालशोषण, बालविवाह आणि बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

सुरक्षित बचपन अभियान यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी पी. एम. अनमदवार, वरिष्ठ लिपिक, एस. एल. गरमळकर, शिपाई, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित विद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देऊन बालहक्क आणि सुरक्षिततेबाबत जागरूक करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.





  Print






Related Photos