तरुणीचा पाठलाग करून मोपेडला धडक; चापट मारून धमकी : आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कॉलेजला जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिच्या मोपेडला मोटारसायकलने धडक दिल्यानंतर शिवीगाळ करून चापट मारल्याची घटना बल्लारपूर येथे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी फैजान शेख याला अटक केली.
तरुणीची फैजान शेख याच्याशी पूर्वीपासून ओळख होती. मात्र, त्याचे वर्तन पसंत नसल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद करण्यास सांगितले होते. असे असतानाही तो वारंवार बोलण्याचा आग्रह धरून त्रास देत होता.
गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता तरुणी आपल्या चुलत बहिणी व मैत्रिणीसोबत मोपेडने कॉलेजकडे जात होती. आरोपी फैजान शेख हा तरुणीचा वाट पाहत उभा होता. त्याने तरुणीला थांबण्याचा आवाज दिला. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तरुणी पुढे निघाली. यानंतर आरोपी फैजानने मोटारसायकलने तिचा पाठलाग केला.
कॉलेजच्या गेटसमोर फैजानने मोटारसायकलने तरुणीच्या मोपेडला धडक दिली. या धडकेत तरुणी व तिची मैत्रीण खाली पडल्या. त्यानंतर आरोपी फैजानने तरुणीला आपल्यासोबत येण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करत तिच्या गालावर चापट मारली आणि मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर तरुणीने आपल्या चुलत भावाला फोन करून प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे भीती वाटत असल्याचे सांगत तिने बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून आरोपी फैजान शेख याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८, १२६(२), ३५१(२), ३५२ व ११५(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे करीत आहेत.




Petrol Price




