टेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी प्रयत्न करा


- नागरिकांचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला येथे बिएसएनएलचे टाॅवर उभारण्यासाठी पाठपुरावा करा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 
टेकडाताला तसेच परिसरातील गावातील नागरिक बिएसएनएल चे सिम कार्ड वापरतात. मात्र या परिसरात टाॅवर नसल्यामुळे कव्हरेज योग्यरित्या पकडत नाही. यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत. कधी कधी तेलंगणा राज्यातील खासगी कंपनीच्या टाॅवरच्या सेवेवर नागरिकांना अवलंबून रहावे लागते. मात्र अनेकदा रेंज कमी राहत असल्यामुळे  संपर्क योग्यरित्या होत नाही. टेकडाताला परिसराची लोकसंख्या पाच हजाराच्या जवळपास आहे. तसेच २० गावे असून या गावांमध्ये नेटवर्कची मोठी समस्या आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी टाॅवरची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. 
जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी तसेच बिएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना साई मंदा , जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, किरण वेमुला, बोरीचे सरपंच आदी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-21


Related Photos