निकालामध्ये गडबड ! तेलंगणात २१ विद्यार्थ्यांची आत्महत्या


वृत्तसंस्था / हैद्राबाद :  तेलंगणा राज्यातील १२ वी परीक्षेचे निकाल १८ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले.  निकाल जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी झाला असताना  नापास झालेल्या आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  तेलंगणा बोर्डाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेत १० लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३ लाख विद्यार्थी नापास झाले होते. यानंतर निकालामध्ये गडबड झाल्याचे वृत्त आले होते.
विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या वृत्तानंतर २६ एप्रिल रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक भरण्याचे काम हैदराबादमधील खासगी कंपनी ग्लोबलरेना टेक्नोलॉजीला का दिले गेले असा सवाल आयोगाने विचारला आहे. याआधी हे काम सरकारी कंपन्यांना दिले जात होते. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव एस.के.जोशी यांना चार आठवड्यात याचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित आरोपींवर काय कारवाई केली व पीडित कुटुंबांना कशा प्रकारे मदत केली याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ग्लोबलरेना टेक्नोलॉजी ची  कामगिरी चांगली नसताना आणि त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून सुद्धा हे काम त्यांना देण्यात आले होते. १२ वीचा निकाल लावताना गडबड झाल्यामुळे अनेक जण नापास झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.  Print


News - World | Posted : 2019-04-28


Related Photos