नृत्य, रॅम्पवॉक अन् खेळांनी रंगला एसएनडीटीचा नवागत स्वागत सोहळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा उत्साह, विविध कलागुणांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत अशा उत्साही वातावरणात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारात नवागत विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ पार पडला. सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नृत्य, रॅम्पवॉक, खेळ आणि विविध सृजनशील उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून छत्रवीर संभाजी महाराज प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा येथील संस्कृत विषयाच्या प्रा. डॉ. चेतना संजय पवार उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. चेतना पवार यांनी शिक्षण हे महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींनी अभ्यासासोबतच विविध क्षेत्रांतील ज्ञान आत्मसात करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी विद्यार्थिनींना सजग, आत्मविश्वासी आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा संदेश दिला.
संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सांस्कृतिक विभागाचे कौतुक केले. डॉ. बाळू राठोड आणि डॉ. वेदानंद अलमस्त यांनी विद्यार्थिनींनी अशा उपक्रमांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यक्तिमत्त्व विकासाची संधी म्हणून पाहावे, असे सांगितले.
कार्यक्रमात परिचय सत्र, रॅम्पवॉक, नृत्य आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. परिचय सत्राचे सूत्रसंचालन सानिका व गौरी यांनी केले. रॅम्पवॉकच्या फेऱ्यांचे संचालन खुशी व प्रा. अपेक्षा पिंपळे यांनी, तर नृत्य सादरीकरणाचे संचालन स्नेहा व आचल यांनी केले. खेळांचे सूत्रसंचालन मिसबाह व सबा यांनी केले.
विविध खेळांमध्ये फुगा खेळात नेहा कोठारकर व सलोनी यादव, कागदी नृत्य स्पर्धेत स्वाती टोंगे व रुपा कोवे, तर उलट खेळात स्वामिनी गुरुनुले व अनुष्का देवगडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रॅम्पवॉकसाठी ऐश्वर्या खोब्रागडे व सुरभी गाडगे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
नवागत स्वागत सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मिस फ्रेशर स्पर्धेत पदवी गटातून रजनप्रीत दारी, तर पदव्युत्तर गटातून फरहिना शेख यांनी विजेतेपद मिळविले. विजेत्या तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळवत उत्साहाने सहभाग घेतला. नवागत विद्यार्थिनींमध्ये परस्पर परिचय वाढविण्यासोबतच आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला या उपक्रमातून चालना मिळाली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अश्विनी वाणी यांनी आभार मानले. सांस्कृतिक विभाग, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थिनींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.




Petrol Price




