महत्वाच्या बातम्या

 १ ते ७ ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्या होणार उदघाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी १ ते ७ ऑगस्टदरम्यान जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात दुपारी चार वाजता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महसूल दिनापासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात १ ऑगस्ट रोजी सप्ताहाचा शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी युवा संवाद, ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद, ५ ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम, ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील महसूल विभागातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे.

उदघाटन समारंभादरम्यान गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ई ऑफिसविषयीची माहिती तसेच पुढील एका वर्षाचे व्हिजनही यावेळी ठरविण्यात येणार आहे.

महसूल विभाग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वपूर्ण विभाग आहे. या विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा, जागरूकता वाढावी, शासनाबद्दलचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम या सप्ताहादरम्यान राबविण्यात येणार आहेत. महसूल सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, नागरिकांची महसूल विषयक विविध कामे, माजी सैनिकांचे प्रलंबित विषय निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos