महत्वाच्या बातम्या

 रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या बैठकीकडे वैदर्भीय खासदारांची पाठ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : काम जसे चालते तसे चालू द्या आणि रेल्वे जशी धावते तशी धावू द्या, अशी काहीशी भूमीका स्वीकारत विदर्भातील बहुतांश खासदारांनी प्रवासी, तसेच रेल्वेशी संबंधित शुक्रवारच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पाठ दाखवली.

संबंधित विभागात रेल्वेची गाडी कशी धावत आहे. अर्थात, त्या विभागात रेल्वेशी संबंधित कोणत्या विकासकामांची तातडीने गरज आहे, ती होण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आहेत, कोणती विकासकामे सुरू आहेत, त्या कामांची सद्य:स्थिती कशी आहे, कोणत्या अडचणीमुळे कोणते काम रखडले आहे आणि त्या कामांना कशा पद्धतीने गती दिली जाऊ शकते, याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आणि या चर्चेतून त्या विभागातील रेल्वेच्या विकासकामांचा रोड मॅप तयार करण्यासाठी वर्षातून एखाद- दोनवेळी रेल्वेचे शीर्षस्थ अधिकारी आणि खासदारांची बैठक आयोजित करण्यात येते.

या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल थेट रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डाकडे जातो. अडचणी दूर करून रेल्वेच्या विकासकामांची गाडी पळविण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून तातडीने निर्णय घेतले जातात. म्हणूनच ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे या बैठकीची रीतसर पूर्वसूचना देऊन त्या- त्या विभागाच्या खासदारांना निमंत्रित केले जाते. ७ जुलैला अशाच प्रकारे रेल्वेच्या नागपूर आणि भुसावळ विभागांतील खासदारांची बैठक मध्य रेल्वेकडून नागपुरात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, तसेच दोन्ही विभागांतील रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आणि अन्य बडे अधिकारी उपस्थित होते. मात्र, विदर्भातील बहुतांश खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

विदर्भातील केवळ एकमात्र खासदार राज्यसभा अनिल बोंडे उपस्थित होते. विदर्भाबाहेरचे नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे, धुळ्यातील खासदार डॉ. सुभाष भामरे, खंडवा मध्य प्रदेश येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील आणि बैतूलचे खासदार दुर्गादास उईके हेसुद्धा उपस्थित होते. या खासदारांनी आपापल्या विभागातील समस्या, मागण्या हिरीरीने या बैठकीत रेटल्याही. मात्र, नागपूर, रामटेक, वर्धा, यवतमाळ- वाशिम, अमरावती, बुलडाणा, अकोला, गडचिरोली आणि गोंदिया- भंडारा लोकसभा मतदारसंघातील खासदार अनुपस्थित असल्याने या विभागातील रेल्वेच्या रखडलेल्या अनेक प्रकल्प, तसेच विकासकामांबाबत चर्चा झाली नाही.

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची व्यस्तता, प्रोटोकॉल आणि रेल्वे मंत्रालयाशी त्यांची कनेक्टिव्हिटी समजण्यासारखी आहे. अन्य खासदारांच्या अनुपस्थितीमागचे कारण जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, वर्धेचे खा. रामदास तडस आणि अमरावतीच्या खा. नवनीत राणा यांचा अपवाद वगळता अन्य कुणाशी संपर्क होऊ शकला नाही.

मी पूर्वनियोजित शासकीय कामाच्या निमित्ताने कमिटीचा दाैरा गोव्यात आहो. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र, रेल्वे अधिकारी आणि मंत्रालयाकडे आपल्या मतदारसंघातील रेल्वेच्या कामांबाबत नियमित पाठपुरावा सुरू असतो.-रामदास तडस,खासदार, वर्धा

पूर्वनियोजित दाैऱ्यामुळे बाहेर असल्याने या बैठकीला येऊ शकले नाही परंतु आमच्या क्षेत्रातील रेल्वेच्या कामाच्या समस्या, अडचणी आणि प्रवाशांच्या मागणीसंदर्भाने मी रेल्वे मंत्रालय, महाव्यवस्थापक, तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या सलग संपर्कात असते. नवनीत राणा,खासदार, अमरावती





  Print






News - Nagpur




Related Photos