नांदेडचे वीर जवान राजेमोड यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
नांदेडचे वीर जवान मारोती कोडिंराम राजेमोड यांच्या कुटुंबियांसाठी शासनाच्यावतीने पाच लाख रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीर पत्नी प्रभावती राजेमोड यांना देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर  उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील पांडुराणा (ता. भोकर) येथील वीर पूत्र मारोती राजेमोड  यांचे उधमपूर येथे १७ ऑक्टोबर २०१८ रोजी कर्तव्यार्थ असताना निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांकरिता विशेष बाब म्हणून सैनिक कल्याण विभागाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली होती. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीमती राजेमोड यांच्याकडे सूपुर्द केला. याप्रसंगी राजेमोड यांचे वडील कोडिंराम, आई अनुसयाबाई, शहिद जवानाची मुलगी श्रावणी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजेमोड कुटुंबियांची आस्थेवाईक विचारपूसही केली. 
यावेळी सैनिक कल्याण विभाग पुणेचे प्रभारी संचालक दिपक नलावडे, नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले, संघटक कमलाकर शेटे, तसेच मुंबई शहर जिल्ह्याच्या सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नापारखी, संघटक चित्रसेन गडांकुश आदी उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-08


Related Photos