महत्वाच्या बातम्या

 मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यपालक, विक्रेते व नागरिकांना आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मत्स्यपालक, मच्छिमार, मत्स्य सहकारी संस्था, मत्स्य शेतकरी, मत्स्यबीज विक्रेते, मासे विक्रेते तसेच नागरिकांना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येते की, प्रतिबंधित परदेशी मांगूर (Thai Magur/Exotic Catfish –Clarias gariepinus) माशाचे पालन, संवर्धन, प्रजनन, मत्स्यबीज निर्मिती/संचयन, विक्री, खरेदी, वाहतूक अथवा साठवणूक करू नये.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे निर्देश -
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (National Green Tribunal), प्रधान पीठ, नवी दिल्ली यांनी २२ जानेवारी २०१९ रोजी दिलेल्या आदेशामध्ये Clarias gariepinus (Thai Magur/Exotic Catfish) तसेच त्याच्या संकरित प्रजातींच्या breeding व culturing वर सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रतिबंध असल्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अस्तित्वात असलेला साठा नष्ट करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

मांगूर माशाबाबत विशेष दक्षता -
प्रतिबंधित मांगूर माशाचा प्रसार स्थानिक जलस्रोतांमध्ये होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील तलाव, जलाशय, शेततळी, मत्स्यपालन केंद्रे व इतर जलसाठ्यांमध्ये अशा माशांचे अनधिकृत संचयन किंवा पालन होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. विशेषतः मत्स्यपालकांनी मत्स्यबीज खरेदी करताना त्याची प्रजाती व स्रोत याची खात्री करूनच मत्स्यबीज संचयन करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून प्रतिबंधित मांगूर माशाचे मत्स्यबीज खरेदी करू नये.

मासे विक्रेत्यांनीही काळजी घ्यावी -
जिल्ह्यातील मासे विक्रेते, घाऊक विक्रेते व संबंधित व्यावसायिकांनी प्रतिबंधित मांगूर माशाची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करू नये. अशा माशाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी.

तपासणी व कार्यवाही -
प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन अथवा संवर्धन होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यास संबंधित मत्स्यपालन केंद्र, तलाव, शेततळे किंवा इतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येईल. प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन, संवर्धन अथवा अस्तित्वातील साठा आढळून आल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशांनुसार तसेच प्रचलित कायदे व शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. उपलब्ध संदर्भामध्ये विद्यमान साठ्याची तपासणी करून तो नष्ट करण्यासाठी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी पथकांबाबतही निर्देश नमूद आहेत.

नागरिकांना आवाहन -
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील तलाव, शेततळी किंवा मत्स्यपालन केंद्रांमध्ये प्रतिबंधित मांगूर माशाचे पालन किंवा विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांच्या कार्यालयास कळवावी.

जिल्ह्यातील मत्स्यपालकांनी भारतीय स्थानिक मत्स्यप्रजातींचे संवर्धन व शाश्वत मत्स्यव्यवसायास प्राधान्य देऊन प्रतिबंधित मांगूर माशाचा प्रसार रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांनी केले आहे.





  Print






Related Photos