महत्वाच्या बातम्या

 कोरची तालुक्यातील चार ठिकाणी जनावर तस्करांचा गोठा : तस्कर कत्तलखाना हैद्राबाद-नागपूरला मध्य रात्रो व पहाटेच काढतात गाड्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची तालुक्यातील चार ठिकाणी जनावर तस्करांचा मोटा गोठा आहे. तर या चारही ठिकाणावरून तस्कर हे हैदराबाद व नागपूर कत्तलखान्यासाठी मध्यरात्रीला व पहाटेच ट्रक व पिकअपमध्ये जनावर कोंबून भरून गाड्या काढतात. कारण कोरची तालुका नक्षलदृष्ट्या संवेदनशील भाग असल्याने येथील पोलिसांना केव्हाही बाहेर पडता येत नाही याचा फायदा नागपूर वरून कोरचीला ठाण मारून बसलेले जनावर तस्कर उचलत आहेत. तसेच शेजारच्या छत्तीसगड राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची तस्करी केली जात आहे. मागील महिन्यात छत्तीसगड राज्यातील चिल्हाटी-बोटेकसा या मार्गावर पोलिसांनी तीन ते चार वेळा जनावर तस्करांच्या गाड्या पकडून कारवाई करून जनावरांना जीवनदान दिले आहे.
कोरची तालुक्यातील बोरी, बोटेकसा, कोटरा, घुगवा व गोंदिया जिल्ह्यातून व छत्तीसगड जवळील देवसुर हे ठिकाण तस्करांचे अड्डे बनले आहेत. यामधील बोरी, बोटेकसा, कोटरा व घुगवा या गावातील जंगल परिसरामध्ये या तस्करांचे जनावरांचे मोठे गोठे आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत तालुक्यातील परिसरामधील गाय, बैल, व रेडे या गोठ्यामध्ये जमा करतात त्यानंतर रात्रीला ट्रक व पिकप मध्ये कोंबून भरून रात्रोला व पहाटे दरम्यान कत्तलीसाठी नागपूर व हैद्राबादसाठी निघतात. एक-दोन दिवसा आड पाच ते सहा ट्रक व चार ते पाच पिकप मध्य रात्रो व पहाटेला जंगल मार्गाने निघत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनेकदा कोरची, बेडगाव पोलिसांनी नाकेबंदी लावून जनावर तस्करांच्या गाड्या पकडल्या आहेत परंतु जनावर तस्कर पोलिसांना न जुमानता तस्करी सुरूच ठेवली आहे.
मागील काही वर्षात तालुक्यातील सातपुती व गुटेकसा गावाजवळ ट्रक फसल्याने तर भीमपूर नाल्याच्या शेतशिवारात अनियंत्रित ट्रक घुसल्याने अनेक जनावरांना जीवनदान मिळाले आहे. तर काही जनावरांचे गाडीतच कोंबून मृत्यू झाले आहे. महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्या बंदी लागू झाल्यानंतरही हैदराबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमितपणे जनावर नेल्या जात आहे. गोहत्या व गोवंश हत्या बंदी कायदा झाल्यानंतर गोवंश तस्करी बंद होण्याऐवजी वाढतच आहे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनावर तस्करांना रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याची आता गरज आहे.


कोरची तालुक्यातुन खूप जास्त जनावर तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती तेव्हा आम्ही बजरंग दल संघटनेचे सर्व पदाधिकारी सापळा रचून बेडगावच्या बोरी फाट्यावर पीक आडवी करून तीन ट्रकांना अडविले. तेव्हा ट्रकमधून १८३ जनावरांना कोंबून कत्तलखान्यात नेत होते त्यांना बेडगाव पोलिसांच्या मदतीने ब्रह्मपुरी येथील गौशाला येथे सुखरूप पाठविण्यात आले होते.
कोरची तालुका नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असून या भागातील अनेक गावे जंगलपरिसरात असल्याने पोलिसांना जाणे धोक्याचं किंवा जीवितास होऊ शकते त्यामुळे तस्कर अंधाराच व रात्रींचा फायदा घेत जंगल व चोरट्या मार्गाने निघून जातात यामुळे पोलिसांना कारवाई करणे शक्य नसते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos