नक्षल्यांनी हत्या केलेले पाचही नागरीक पोलिस खबरी नाहीत : पोलिस अधीक्षक बलकवडे


- निरपराध नागरीकांचा घेतला बळी, मृतकांच्या कुटूंबीयांचे पालकत्व पोलिस विभाग स्वीकारणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांनी पुकारलेल्या सप्ताहादरम्यान  पाच नागरीकांची हत्या केली आहे. त्यांच्या प्रेताजवळ पत्रके टाकून ते पोलिसांचे खबरी असल्याचे म्हटले आहे. मात्र हत्या करण्यात आलेल्या पाचही जणांचा पोलिस विभागाशी कोणताही संबंध नव्हता. नक्षल्यांनी निरपराधांची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज ३१ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पोलिस विभाग नक्षल्यांचे कंबरडे मोडत असल्यामुळे त्यांनी निरपराध नागरीकांना लक्ष्य केले आहे. नक्षल सप्ताहादरम्यान  भ्याड हल्ले केले जात आहेत. जाळपोळ करणे, बॅनर बांधून, झाडे तोडून रस्ते अडविणे असे कृत्य केले जात आहे. नागरीकांना पोलिस खबरी ठरवून हत्या केली जात आहे. सामान्य जनतेच्या मनामध्ये पोलिसांप्रती द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाच नागरीकांची हत्या करून त्यांना पोलिस खबरी असल्याचे संबोधले. मात्र या नागरीकांचा कोणत्याही घटनांशी संबंध नाही. हत्या करण्यात आलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांचे पोलिस प्रशासनाने पालकत्व स्वीकारले आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या रक्षणाची जबाबदारी पोलिस विभागाने घेतली आहे, असेही पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.
एखाद्या घटनेबाबत पोलिस विभागाच्या विरोधात विविध संघटना पुढाकार घेवून आरोप प्रत्यारोप करतात. मात्र नक्षल्यांनी पाच नागरीकांची हत्या केल्यानंतर एकही संघटना पुढे आली नाही, अशी खंत पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी व्यक्त केली. कसनासूर येथील चकमकीप्रकरणी पोलिसांचा खबरी दुसराच असून नक्षल्यांनी हत्या केलेल्या तिघांचा पोलिसांशी काहीही संबंध नाही. या तिघांकडून बंदुकीच्या धाकावर अनाज उकळला होता, अशी माहिती मिळाली आहे. 
आतापर्यंत विविध घटनांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पीतांना पोलिस विभागाने संरक्षण दिले आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. यामुळे नक्षल्यांनी हिंसक कारवाया सोडून आत्मसमर्पण करावे, असेही आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos