टीव्ही चॅनेल निवडण्यासाठी आज शेवटचा दिवस !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
'ट्राय'च्या नव्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड केली नसेल तर आज, गुरुवारी शेवटची संधी आहे. अन्यथा, शुक्रवार, १ फेब्रुवारीपासून तुम्हाला तुमच्या आवडत्या सशुल्क टीव्ही वाहिन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांनी नोंदणी केली आहे त्याच ग्राहकांना या वाहिन्या दाखविल्या जाणार असून, राज्यभरात अद्याप ६० टक्के ग्राहकांनी अशी नोंदणीच केली नसल्याचे समजते. 
'आपल्या आवडीनुसार वाहिन्या निवडा आणि तेवढेच पैसे भरा' या 'ट्राय'च्या निर्णयानंतर आजमितीस समोर येत असलेल्या पॅकेजांमुळे केबलग्राहकांमध्ये मोठा गोंधळ उडाला असून, त्यांना केबल सेवा सध्यापेक्षा महाग वाटू लागली आहे. म्हणूनच अनेक ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण करण्यात स्वारस्य दाखवलेले नाही. काही भागात केबलचालकही ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. या सर्व गोंधळाचा फटका १ फेब्रुवारी रोजी ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आज, ३१ जानेवारीपर्यंत केबलचालकांना त्यांच्या पसंतीच्या सशुल्क वाहिन्यांचा अर्ज भरून न दिल्यास त्यांना केवळ 'फ्री टू एअर'मध्ये दाखविण्यात येणाऱ्या १०० वाहिन्याच पाहता येणार आहेत. 
नव्या नियमांनुसार प्रत्येक ब्रॉडकास्टर (वाहिन्या प्रसारित करणाऱ्या कंपन्या) त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या ग्राहकांनाच सेवा देऊ शकतील. इतकेच नव्हे, तर या कंपन्यांकडून सर्व नोंदणींचे दर आठवड्याला परीक्षणही केले जाईल. 'ट्राय'च्या या निर्णयाविरोधात केबलचालकांनी दंड थोपटले होते. तसेच, यासाठी मुदतवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, 'ट्राय'ने त्यास बुधवारी स्पष्ट नकार दिला. यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून होणार हे निश्चित आहे. 
दरम्यान, एमएसओ आणि केबलचालकांदरम्यान उत्पन्नवाटपाबाबत कोणताही करार झालेला नाही. या करारात १३० रुपयांपैकी ९० ते १०० रुपये केबलचालकांना द्यावेत, अशी मागणी आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असून, लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र केबल ऑपरेटर संघाचे अरविंद प्रभू यांनी व्यक्त केली. तर, १ फेब्रुवारी रोजी वाहिन्या बंद होऊन उडणाऱ्या गोंधळास पूर्णपणे 'ट्राय' जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे सरचिटणीस तुषार आफळे यांनी दिला आहे. 
केबलचालकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. मात्र, काही ग्राहकांनी अद्याप अर्ज भरून दिलेले नसून, काही भागांत केबलचालकही मनुष्यबळाअभावी ग्राहकांपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. यामुळे ग्राहकांनीच पुढाकार घेऊन केबलचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केबल ऑपरेटर संघाचे अरविंद प्रभू यांनी केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-31


Related Photos