महत्वाच्या बातम्या

 भंडारा : बियाणे व खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खतांचा पुरवठा व निविष्ठांच्या काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक आणि फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत, त्यांच्या समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे.

कंट्रोल रूममध्ये राज्याकडील कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात, या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे.

जादा दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी निवारण कक्षात तक्रार नोंदवावी, शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन ९८२३५४७८६१ या डेडिकेटेड नंबरवर तक्रार नोंदवावी. मोबाइल नंबरचा प्रचार, प्रसार संपूर्ण जिल्ह्यात करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.

१५ ऑगस्टपर्यंत राहणार नियंत्रण कक्ष

नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) १५ मे ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत सुरू राहील. संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३५४७८६१ असा असून, हा क्रमांक तक्रार नोंदविण्यासाठी डेडिकेटेड करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना तक्रार करावयाची असल्यास या क्रमांकावर नोंदवावी, त्याची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos