महत्वाच्या बातम्या

 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा तीन हजारांवर प्रशिक्षणार्थीनी घेतला लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये व संस्थांमधील पदभरतीत आदिवासी उमेदवारांचा टक्का वाढावा यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे आदिवासी उमेदवारांकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण योजना राबविल्या जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल तीन हजार प्रशिक्षणार्थ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून त्यामुळे सुमारे ८०० प्रशिक्षणार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरी प्राप्त झाली आहे.

राज्य शासनातर्फे आदिवासीबहुल वस्तीत खास आदिवासी उमेदवारांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. चंद्रपूर येथील केंद्र १ ऑगस्ट १९८६ पासून सुरू झाले आहे. या केंद्रात प्रशिक्षण सत्राचा कालावधी साडेतीन महिन्याचा असून वर्षभरात प्रशिक्षणाची एकूण तीन सत्रे आयोजित केली जातात. प्रशिक्षण सत्र  एप्रिल, ऑगस्ट व डिसेंबरच्या १ तारखेपासून सुरू होते. प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करतांना वृत्तपत्रात जाहिरात देवून अर्ज मागविण्यात येतात. याशिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून पात्र उमेदवारांची यादी मागविण्यात येते. यातून उमेदवारांची निवड समितीद्वारे प्रत्यक्ष मुलाखत घेवून करण्यात येते. निवड होण्यासाठी आदिवासी उमेदवार किमान शालांत परिक्षा उत्तीर्ण असावा, तथापि उच्च शैक्षणिक अहर्ताधारकांना प्राधान्य देण्यात येते. एका सत्रासाठी ४० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येते.

प्रशिक्षण सत्रात उमेदवारांना इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान तसेच बुद्धीमत्ता, व्यक्तीमत्व विकास व मराठी व्याकरण हे विषय तज्ञ प्राध्यापकांकडून शिकविले जातात तसेच विविध विषयावर माहितीपर व्याख्याने आयोजित केली जातात. विविध स्पर्धा परिक्षांची माहिती देवून रिक्त पदांसाठी अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यासोबतच स्वयंरोजगाराच्या योजनांची माहितीही दिल्या जाते. प्रशिक्षणार्थींसाठी ग्रंथालयाची सोय असून स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त पुस्तके, वृत्तपत्रे, रोजगार समाचार उपलब्ध केली जातात. तसेच पुस्तके वाचण्याकरिता स्वतंत्र अभ्यासिका कक्षाची सोय देखील करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. याशिवाय प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना एक हजार रुपये दरमाह विद्यावेतन दिल्या जाते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी चंद्रपूर प्रशासकीय इमारतच्या पहिल्या माळ्यावरील आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, येथे संपर्क करावा.





  Print






News - Chandrapur




Related Photos