जिल्हा निर्मितीपासूनच्या ४० वर्षातील आणि ४ वर्षांच्या विकासात मोठी तफावत : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम


- मागील चार वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा सांगणे कठीण
- मिट ट प्रेस कार्यक्रमात ना. आत्राम यांनी साधला पत्रकारांशी संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: जिल्ह्याची नक्षलग्रस्त, अतिमागास, आदिवासी अशी ओळख असली तरी मागील चार वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा ठेवणे खूप कठीण आहे. जिल्ह्याच्या निर्मितीपासूनच्या ४० वर्षात झाली नाहीत एवढी विकासकामे भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात झालेली आहे. यामुळे ४० वर्षांच्या आणि ४ वर्षांच्या विकासकामांमध्ये खूप मोठी तफावत आहे, असे राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमी ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी म्हटले आहे.
आज एडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित मिट ट प्रेस कार्यक्रमात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ना. आत्राम बोलत होते. 
पुढे बोलताना ना. आत्राम म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही जिल्ह्यातील अनेक  गावे अंधारात होती. तसेच देशभरातील तब्बल १८ हजार गावे अंधारात होती. या गावांना प्रकाशमान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजना राबविली. या माध्यमातून जिल्ह्यातील दोनशे गावात विज पोहोचली. यामुळे तेथील अनेक समस्या निकाली निघाल्या. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज उपलब्ध झाली. रात्रीच्यावेळी हिंस्त्र प्राणी, किटक आदींपासूनचा धोका नष्ट झाला, विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय निर्माण झाली. आणखी काही गावे लवकरच प्रकाशमान होतील, असा विश्वास ना. आत्राम यांनी व्यक्त केला.
यासोबतच जिल्ह्यात विकासाला अडथळा ठरत असलेले रस्ते निर्माण करणे याला महत्व देत रस्त्यांची अनेक कामे करण्यात आली. रस्तेच योग्य नसतील तर वाहतूकीची साधने येणार नाहीत, नागरीकांना आवागमन करताना त्रास होतो. यामुळेच रोजगार सुध्दा उपलब्ध होत नाहीत. यामुळे राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी १० हजार कोटींचा निधी खेचून आणला. यामुळे अनेक रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. 
पेयजल योजनेच्या माध्यमातून ५ ते १५ कोटी रूपयापर्यंत च्या पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. आरोग्याच्या सेवा सुधारण्यावर भर दिला. जिथे डाॅक्टर यायला तयार नाहीत तिथे उच्च शिक्षित डाॅक्टर नेमण्यात आले. महिला व बाल रूग्णालय सुरू केले. अहेरी येथे रूग्णालयासाठी निधी मंजूर करवून घेतला. नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे , उपकेंद्रांच्या इमारती निर्माण केल्या. 
विद्युतची समस्या निकाली काढण्यासाठी कोट्यवधी रूपयांचे १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र जिल्हाभरात उभारण्यात आले. यामुळे उच्च दाब वीज उपब्ध झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात भव्य क्रीडांगण आहे. मात्र इतक्या वर्षात कोणत्याही सरकारने क्रीडांगण उभारले नाही. मात्र आता क्रीडांगणाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. साडेआठ कोटी रूपये वनविभागाकडे जमा करून जागेचे हस्तांतरण करण्यात आले आहे. आता लवकरच २५ ते ३० कोटींचे सुसज्ज असे क्रीडांगण उभे राहणार आहे. 
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ना. आत्राम म्हणाले, शेतकऱ्यांना भाजप सरकारने कर्जमाफी दिली. शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होईपर्यंत ही योजना सुरू राहणार, अशी घोषणा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र शेतकऱ्यांना कर्ज घ्यावेच लागू नये व कर्जमाफी करण्याची वेळ येवू नये यासाठी सरकार उपाययोजना करीत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहिर, रोहयो मार्फत कामे राबवून शेतकऱ्यांना समृध्द करण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात नद्या असूनही आजपर्यंत एकही सिंचन प्रकल्प उभा राहू शकला नाही. मात्र आपण पुढाकार घेत रखडलेल्या सिंचन योजनांचे काम सुरू करण्यासाठी राज्यपालांकडून परवानगी घेतली आहे. नवीन कर्जासाठी सुध्दा १३० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना कृषी औजारे उपलब्ध करून दिली. कृषी प्रदर्शनी, अभ्यास दौरे आयोजित केले. याचा नक्कीच फायदा होईल.
आम्ही जिल्हा विकासासाचा पाया मजबूत केला आहे. जिल्हा विकास नियोजनाच्या निधीतून विविध योजनांसाठी निधी खर्च करणार. जिल्ह्यातील प्रत्येक गरजूंना घरकूलाचा लाभ देण्यात येईल. शहरी भागातील नागरीकांसाठी सुध्दा घरकूल योजना राबविली जात आहे. नागरीकांना भौतिक सुविधा दिल्यास ते नक्कीच समाधानी राहतील. यामुळे भौतिक सुविधांवर भर दिला जात आहे. उज्वला योजनेतून गॅस जोडणी दिल्यामुळे महिलांची धूरातून मुक्ती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली. यामुळे आरोग्य, शिक्षण, कृषी आणि रोजगार या बाबींवर भर देवून लवकरच जिल्ह्याला आकांक्षित यादीतून बाहेर काढणार, जिल्हा विकासासाठी अर्थसंकल्पातील तरतूदीव्यतिरिक्त अतिरिक्त ४३ कोटींचा निधी मिळाला आहे,  असेही ना. आत्राम म्हणाले. 
रोजगाराच्या तसेच उद्योगांच्या प्रश्नावर बोलताना ना. आत्राम म्हणाले, जिल्हा निर्मितीनंतरच्या काळात आतापर्यंत फक्त भाजपा सरकारने जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी हिम्मत केली आहे. लोहप्रकल्प उभारल्यामुळे जवळपास ५ हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील युवक बाहेर नोकरी करण्यास इच्छूक नाही. यामुळे रोजगार मेळाव्यातून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. यामुळे जिल्ह्यात उद्योग उभारण्यावर आमचा भर आहे. पोलिस भरतीमध्येसुध्दा यावेळी स्थानिकांनाच संधी देण्यात आली आहे. 
जिल्ह्यात मोह, बांबू, लोहखनीजांवर आधारीत आणखी काही उद्योग उभे करण्यासाठी पाठपुरावा करू. गडचिरोलीत पतंजली चा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादने थेट पतंजली खरेदी करणार आहे. यामुळे एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. 
जिल्ह्यात  पैसेवारी जाहिर करताना घोळ झाल्यास किंवा इतर बाबींमध्ये त्रुटी असल्यास शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून द्याव्यात त्या दुरूस्त करण्याबाबत प्रशासनास सुचना दिल्या जातील, असे ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम म्हणाले. तसेच इतरही बाबींवर त्यांनी मनोगत व्यक्त केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-26


Related Photos