एसएनडीटी महिला विद्यापीठात कला-रेखाटन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला व्यावहारिक दिशा देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथील बी.ए. फॅशन डिझाइन विभागातर्फे कला व रेखाटन विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चंद्रपूर येथील कलाकार अकादमीचे संचालक शुभम शंकर अधिकारी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींना विविध कलाप्रकारांची माहिती दिली. रेखाटन, निसर्गचित्र, व्यक्तिचित्र तसेच विविध कलाकृतींच्या निर्मितीतील बारकावे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. ग्रॅफाइट, कोळसा, ॲक्रिलिक आणि तैलरंग यांसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
रेखाटन करताना रेषांची मांडणी, आकारमान व प्रमाणबद्धता, प्रकाश-छाया, पोत तसेच चित्रातील विविध घटकांचे कलात्मक सादरीकरण यांसारख्या बाबींवर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला. विद्यार्थिनींनी मार्गदर्शकांच्या सूचनांनुसार प्रत्यक्ष चित्रकला व रेखाटनाचा सराव करत विविध कलाकृती साकारल्या. त्यामुळे केवळ सैद्धांतिक माहिती न घेता प्रत्यक्ष कृतीतून कला शिकण्याची संधी विद्यार्थिनींना मिळाली.
शुभम अधिकारी यांनी विविध कला स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ इंद्रधनुष्य स्थळचित्रकला स्पर्धेत २०२२ आणि २०२३ या दोन्ही वर्षांत क्रमांक मिळविला आहे. प्राथमिक व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षांसाठीही ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
कार्यशाळेला एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर परिसराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील शिक्षकवर्गासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. फॅशन डिझाइन विभागातील विद्यार्थिनी करिश्मा नुनावत हिने केले. कार्यशाळेच्या समारोपावेळी सहाय्यक प्राध्यापक प्रणाली गौरकर यांनी आभार मानले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थिनींच्या कलात्मक कौशल्यांना चालना मिळून त्यांच्या सर्जनशील विचारांना नवी दिशा मिळाल्याचे यावेळी दिसून आले.




Petrol Price




