महत्वाच्या बातम्या

 घरात किती रोख रक्कम ठेवता येते : जाणून घ्या काय आहेत आयकर नियम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था /  मुंबई : ईडी किंवा आयकर खात्याच्या धाडी रोज कुणावर ना कुणावर पडतात. या धाडींमध्ये कोट्यवधींची कॅश मिळत असल्याचे समोर येतेय. काही वेळा बँकांमध्येही एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश नसते तितकी कॅश ही एखाद्या धाडीत सापडते. एखादा व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात कॅश घरात ठेवू शकतो का ? आपण आपल्या घरात किती प्रमाणात कॅश ठेवू शकतो जेणेकरून आपण कायद्याच्या कोणत्याही कचाट्यात सापडणार नाही ? असा सर्वसाधारण सगळ्यांनाच पडतो. नव्या आयकर नियमानुसार, एखादा व्यक्ती घरात किती कॅश ठेवू शकतो हे त्याच्या आर्थिक कमाईवर आणि पैशाच्या हस्तांतरणाच्या नोंदीवरुन ठरवता येते.

आयकरच्या नव्या नियमानुसार, कोणी घरात किती प्रमाणात कॅश ठेवावी याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या घरात कितीही कॅश ठेवू शकता, फक्त ठेवलेल्या प्रत्येक पैशाची नोंद तुमच्याकडे असावी, तो पैसा कुठून कमावला आणि तुम्ही त्यावर किती कर भरला याचा पुरावा तुमच्याकडे असावा. तुम्ही आयटीआर भरला आहे का याचा पुरावा असावा. या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

आयकर नियमानुसार, जर तुमच्या घरी बेहिशोबी रक्कम सापडली तर त्यावर १३७ टक्के कर लागू शकतो.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या नियमानुसार, जर ५० हजार रुपयांच्या वर रक्कम डिपॉजिट करत असाल किंवा ती बँकेतून काढत असाल तर पॅन कार्ड दाखवावे लागेल. जर पैशाचा हा व्यवहार वर्षाला २० लाखांहून जास्त रुपयांचा असेल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल. हे जर दाखवू शकला नाहीत तर तेवढाच दंड लागेल.

कॅश ट्रान्सफर करताना या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

- एका वर्षात बँकेतून एक कोटीहून अधिक रक्कम काढली तर त्यावर दोन टक्के टीडीएस (TDS) भरावा लागेल.

- एका वर्षात २० लाखाहून अधिक पैशाच्या व्यवहारावर तुम्हाला दंड लागू शकतो. ३० लाखांच्या वरील खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास त्याचा तपास होऊ शकतो.

- काहीतरी खरेदी करायचे असेल तर दोन लाखाहून अधिक कॅश देऊ शकत नाही. जर ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल.

- क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक व्यवहार केल्यास त्याचा तपास होऊ शकतो.

- एकाच दिवसात नातेवाईकाकडून किंवा मित्रांकडून दोन लाखाहून जास्त कॅश घेऊ शकत नाही. हा व्यवहार बँकेच्या माध्यमातून केला जाणे बंधनकारक आहे.

- कुणाकडूनही २० हजार पेक्षा जास्त रुपयांचे कर्ज हे कॅश स्वरुपात घेऊ शकत नाही.

- जर दान करायचे असेल तर दोन हजाराहून अधिक रुपये तुम्ही कॅशच्या स्वरुपात दान करु शकत नाही.





  Print






News - Rajy




Related Photos