'अपील'मुळे उजेडात आला बलात्कार आणि थांबला बाल विवाह


-१०९८, १०९१ टोल फ्री क्रमांक ठरतोय उपयुक्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी किशोर वयीन  मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या शिक्षणाच्या आणि इतर समस्या त्यांना मोकळेपणाने सांगता याव्यात यासाठी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या सहकार्याने अपील उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. यामध्ये १०९१ आणि १०९८ हा टोल फ्री क्रमांक मुलींना उपलब्ध करुन दिला असून या टोल फ्री क्रमांकामुळे एक बलात्कार आणि एक बालविवाहाची गंभीर घटना उजेडात आली आहे.
जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख महिलांच्या समान वागणुकीचा पुरस्कार करणारा आणि तेवढाच संवेदनशील असेल तर महिला आणि मुलींच्या प्रश्नावर कसे गांभीर्यपूर्वक काम केले जाऊ शकते याचे उदाहरण वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घालून दिले आहे.
शाळेत आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना रोडरोमियोचा त्रास होतो आणि त्यामुळे अनेक मुली हा त्रास सहन करून मानसिक ताण घेऊन शिक्षण सुरू ठेवतात किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित तरी व्हावे लागते. अजूनही मुलींमध्ये याविरुद्ध आवाज उठविण्याची किंवा बोलण्याची हिम्मत होत नाही. यामध्ये कौटुंबिक, शहरी, ग्रामीण  पार्श्वभूमी, आई- वडिलांचा पाठिंबा असे अनेक  घटक महत्वाचे असतात..
 ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थिनी महाविद्यालयात शिकायला येतात. अशा वेळी त्यांच्याशी दुरवर्तन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध त्या बोलू शकत नाहीत. कदाचित घरी आईवडिलांना सांगितले तर त्यांचे शिक्षण थांबण्याची भीतीही त्यांना वाटते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थिनी हा त्रास सहन करतात. पण याचा आघात त्यांच्या शरीरावर आणि मनावर कायमस्वरूपी राहतो.  त्यामुळे अशा मुलींना त्यांचं म्हणणं ऐकून घेणार एक मुक्तघर उपलब्ध करून देण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी केला. यातून अपील या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यामध्ये १०९१ आणि १०९८ हे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले.  जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी,  पोलीस विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सदस्य  यांचा सहभाग यात घेण्यात आला. ही चमू  जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी शाळांमध्ये कार्यशाळा घेत आहेत. यामध्ये मुलींना रोडरोमियो, चिडीमारी,  त्यांचे शारीरिक आरोग्य, किंवा त्यांना कोणतीही अडचण, समस्या वाटत असल्यास न घाबरता टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्यास सांगण्यात येते. तसेच आरोग्याच्या समस्यांबाबत समुपदेशन करण्यात येते. 
याचा चांगला फायदा होत असून दोन अतिशय गंभीर प्रकरणे यामुळे उघडकीस आली आहेत.  ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींवर  तिच्या मैत्रिणीच्या मित्राने  बलात्कार केल्याची घटना यामुळे उघडकीस आली आहे.   ११ वी मध्ये शिकणारी नर्मदा (नाव बालविले आहे) ही तिच्या मैत्रिणीने विष घेतल्यामुळे तिच्यासोबत दोन दिवस दवाखान्यात होती. तिथे तिच्या मैत्रिणीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर  तिची आई घरी नसताना तिला एकटे पाहून तिच्या घरात घुसून तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला.  नर्मदाने घाबरून ही माहिती कुणालाही सांगितली नाही. आठवडाभराने तिला महाविद्यालयात या टोल फ्री क्रमांकाविषयी माहीत झाले आणि ती बोलती झाली. महिला व बालकल्याण विभागाच्या चमूने तिला विश्वासात घेऊन तिच्या पालकांचे समुपदेशन करून  त्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे आढळून आले.  पोलिसांच्या चौकशीत मुलगा १७ वर्षाचा असल्याचे आढळून आल्याने त्याला बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
दुसरी घटना बालविवाहाची.  कल्पना ही अशीच एक दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी. तिच्या पालकांनी तिचे लग्न तिच्या संमतीशिवाय ठरविले. ३१ डिसेंबरला लग्नाची तयारी सुरू होती. त्याच दरम्यान तिच्या शाळेत अपील कार्यक्रमांतर्गत झालेल्या जाणीव जागृतीमुळे सदर बालविवाह ठरल्याची  घटना समोर आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, दामिनी पथक यांनी पालकांची भेट घेऊन बालविवाहाचे मुलीवर वाईट परिणाम होतात हे समजावून सांगितले. पण पालक ऐकायला तयार नसल्याने  कायद्याच्या भाषेत समजावून सांगितल्यावर पालकांनी लग्न रद्द केले. अपील मुळे एका मुलीचे आयुष्य खराब होण्यापासून वाचले. ३१ डिसेंबर पर्यंत चमूने मुलीचा पाठपुरावा केला आणि या घटनेवर ब्रोक लक्ष ठेवले. आज कल्पना पुन्हा शाळेत जायला लागली आहे.
असाच एका शाळेत जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणारया रोडरोमियोला या पथकाने चांगलीच समज दिली. तर फेसबुकवर मैत्रीतून प्रेमात पडलेल्या आणि त्या व्यक्तीला भेटायला जयपूरला निघालेल्या  इयत्ता  ११ वित शिकणाऱ्या मुलीची फसवणूक होण्यापासून १०९८ या टोल फ्री क्रमांकाने वाचविले.  Print


News - Wardha | Posted : 2019-01-09


Related Photos