टी-पॉइंट चौकात अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा मुख्यालयातील टी-पॉइंट चौक कॉम्प्लेक्स परिसरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी रविवारी सायंकाळी धडक कारवाई केली. एका ठेल्यामध्ये बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून ६ हजार ४०० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टी-पॉइंट चौक कॉम्प्लेक्स परिसरात काही दिवसांपासून गुपचूप देशी दारूची विक्री सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार श्यामराव अंकम यांनी रविवारी सायंकाळी पथकासह परिसरात धाड टाकली. कारवाईदरम्यान एका ठेल्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ६ हजार ४०० रुपये किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
शहरात बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविली जात असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांची माहिती पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




