तडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपुर :
तडीपार गुंडाने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या घटनेने तडीपार गुंड शहरात दाखल होऊनही पोलिसांना चाहूल कशी लागत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
प्रवीण मोहन बक्सेर (२६) असे आरोपीचे नाव आहे. पीडित १३ वर्षीय मुलगी आरोपीच्या वस्तीत राहते. ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत नवव्या वर्गात शिकत आहे. ती दररोज पायीच शाळेला जाते. आईवडील महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. आरोपी वस्तीतील गुंड असून अवैध दारू विक्री करतो. त्यामुळे परिमंडळ-४ च्या उपायुक्तांनी डिसेंबर २०१७ मध्ये त्याला नागपूर शहरातून तडीपार केले होते. त्यानंतरही तो इमामवाडा परिसरातील आपल्या घरी राहायचा. १४ ऑगस्टला सकाळी पीडित मुलगी शाळेत गेली होती. त्यावेळी आरोपी आपल्या मोपेडने शाळेत गेला. तिला फूस लावून सोबत चालण्यास सांगितले. तिला आपल्या मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला व कुणाकडेही वाच्यता केल्याचे आईवडिलांसह तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिला एक मोबाईल घेऊन दिला. सायंकाळी घरी परतल्यावर तिच्या हातामध्ये मोबाईल दिसल्याने वडिलांनी मोबाईल कुठून आणला, असे विचारले. त्यावेळी तिने आरोपीचे नाव सांगितले व घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी इमामवाडा पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. इमामवाडा पोलिसांनी प्रकरण बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  Print


News - Nagpur | Posted : 2018-08-17


Related Photos