महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- धान्य व मिलेट महोत्सवाचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सध्याच्या काळात आहारातील पोषक तत्वाअभावी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आहारात बदल करुन आरोग्यदायी भरडधान्याचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी आज धान्य व मिलेट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 ते 25 मार्च या या कालावधीत द रुरल मॉल येथे आयोजित धान्य व मिलेट महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह एनबीपीजीआर संस्थेचे डॉ. गोमासे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.विद्या मानकर, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॅा.जीवन कतोरे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वैभव लहाने, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी ठराविक पिके न घेता वेगवेगळी पिके घ्यावी. कृषी उत्पादक कंपनी व शेतकऱ्यांनी उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजार मिळावी यासाठी मालाची गुणवत्ता, पोषक तत्वे, ब्रॅडींग आदी तपासून माल बाजारपेठेत विक्रीस आणल्यास चांगली बाजारपेठ मिळेल. यासाठी मोठे उद्योग स्थापन करुन इतरांना रोजगार द्यावा. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राहुल कर्डिले यांनी केले.

तुती लागवड, स्ट्रॉबेरी, मधुमक्षिका पालन यासारखे प्रकल्प सुरु करावे. यासाठी विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्याचा लाभ घ्यावा, असेही कर्डिले म्हणाले. पारंपारिक पिके नामशेष होत आहे. पारंपारिक पिकांमध्ये ज्वारी, बाजरी या पिकासाठी जमीन व येथील वातावरण पोषक असल्यामुळे तसेच मालाला चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे. यासाठी संस्थेच्या वतीने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या वाणाचे बिज उपलब्ध करुन देण्यात येईल, असे डॉ. गोमासे म्हणाले. संस्थेकडे विविध पिकांचे हजारो प्रकारचे वाण उपलब्ध असून यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडे नोंदणी करावी, असे आवाहन  गोमासे यांनी केले.

यावेळी बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या मानकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन साठे यांनी केले तर आभार परमानंद घायतिडक यांनी मानले. तत्पूवी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महोत्सवाचे फीत कापून उद्घाटन केले. महोत्सवात लावण्यात आलेल्या सर्व स्टॉलला भेट देऊन स्टॉल शेतकऱ्यांनीशी संवाद साधला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती





  Print






News - Wardha




Related Photos