वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात : महिला व बाल विकासतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी या संकल्पनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांचे पोषण, आरोग्य, संगोपन व सर्वांगीण विकास याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पोषण माहाच्या माध्यमातून कुपोषणमुक्त व सुपोषित वर्धा घडविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
स्थानिक पौष्टिक आहारावर भर -
अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध स्थानिक व हंगामी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ताजा व गरम शिजविलेला आहार, आहाराची गुणवत्ता, स्वच्छता तसेच आरोग्यदायी आहाराच्या सवयी याबाबत विशेष जनजागृती केली जाणार आहे.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम -
० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध ईसीडी व पूर्व-प्राथमिक शिक्षणावर आधारित उपक्रम घेण्यात येणार आहेत. पालकांच्या सहभागातून बालकांच्या विकासासाठी घरच्या घरी करता येणाऱ्या कृतींबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
पोषण, आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती -
पोषण माहदरम्यान गर्भवती व स्तनदा माता, किशोरवयीन मुली, बालके व पालक यांच्यासाठी पोषण, आरोग्य, स्वच्छता, ॲनिमिया प्रतिबंध, स्तनपान, पूरक आहार व निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आरोग्य विभागातील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
पोषण ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे या भावनेतून नागरिकांनी पोषण माहतील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे.




Petrol Price




