धक्कादायक ! १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जाणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक


वृत्तसंस्था / पटना :  बिहारमधील छपरा रेल्वे स्थानकावरुन  तब्बल १६ कवट्या आणि ३४ मानवी सांगाडे घेऊन जात असलेल्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.  संजय प्रसाद असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो बलिया-सियालदह एक्सप्रेसने प्रवास करत होता.
उत्तर प्रदेशातील बलिया येथून त्यानं सांगाडे विकत घेतले होते, आणि भूतानमार्गे ते चिनला पोहोचवायचे होते असं पोलिसांच्या चौकशीत त्याने कबुल केलं आहे. पण नेमकं कशासाठी या सांगाड्यांचा वापर केला जाणार होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय त्याच्याकडून नेपाळ आणि भूतानमधील चलन, अनेक एटीएम कार्ड, दोन ओळखपत्र, नेपाळचे सिम कार्डदेखील जप्त केले आहेत, अशी माहिती पोलीस उप-अधीक्षक (रेल्वे) तनवीर अहमद यांनी दिली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून सखोल चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचंही अहमद यांनी सांगितलं. वेगवेगळ्या देशांमध्ये तंत्रमंत्रासाठी मानवी सांगाड्यांचा पुरवठा करणाऱ्या टोळीत संजय प्रसादचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.  Print


News - World | Posted : 2018-11-28


Related Photos