महत्वाच्या बातम्या

 शेकडो अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त : रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वन अकादमी ते वन विभागाच्या नाक्यासमोरील चंद्रपूर वनपरिक्षेत्रातंर्गत उपक्षेत्र चंद्रपूर नियतक्षेत्र बाबूपेठ येथील कक्ष क्रमांक ४०२, ४०३ मधील राखीव वनात अनेकांनी अतिक्रमण करून मोठ-मोठे ठेले, दुकान, पानठेले थाटले होते. वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक या अतिक्रमित दुकानांवर बुलडोझर चालवून सर्व दुकाने जमीनदोस्त केले. त्यामुळे आता त्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या नालीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी चांगला झाला होता. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण होताच वन अकादमीच्या समोरून बंगाली कॅम्प ते वनविभागाच्या नाक्यासमोर रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले. काहींनी हातगाडी, पानठेले, तर काहींनी चक्क मोठ-मोठे ढाबे थाटले होते.

ही जागा वनविभागाच्या अखत्यारित येत असल्याने वनविभागाने अनेकदा ते अतिक्रमण हटविण्यास त्या व्यावसायिकांना सूचना दिल्या होत्या. मात्र, ते वन विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत होते. शुक्रवारी सकाळी वनविभागाचे अधिकारी, मनपा अधिकारी, पोलिसांची चमू थेट बुलडोझर घेऊन त्या परिसरात गेली अन् तेथील नागरिकांना काही कळायच्या आत अतिक्रमण हटविणे सुरू केले. त्या मार्गावर असणारी सुमारे शंभरच्या जवळपास दुकाने हटविण्यात आली.

ही कारवाई मुख्य वन संरक्षक लोणकर, मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक उपवनसंरक्षक निकीता चौरे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत अधिकारी राहुल कारेकर, संरक्षण पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गुरुडे, पोलिस निरीक्षक राजेश मुळे, नायब तहसीलदार खांंडले, यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक आर. एम. पाथर्डे, क्षेत्र सहायक ए. पी. तिजारे, वनपाल घागरगुंडे, वनपाल शिंदे, वनपाल पडवे, वनरक्षक पी. ए. कोडापे, व्ही. पी. भीमनवार, डी. बी. दहेगावकर, बी. एम. वनकर, वनरक्षक बैनलवार यादव, वनरक्षक पारवे, संरक्षण पथक आरआर युनिट, चिचपली व भद्रावती वन परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी, एसटीपीएफ कर्मचारी, वनमजूर आदींनी केली. यावेळी पोलिसांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.


व्यावसायिकांची उडाली तारांबळ

वन विभागाच्या पथकाने सकाळीच बुलडोझर घेऊन वन अकादमी परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी अनेक दुकानदार व्यावसायिक दुकाने उघडण्याच्या तयारीत होते, तर काहींनी नुकतेच दुकान उघडले होते. एकाकी वन विभागाच्या पथकाला बुलडोझरने अतिक्रमण हटविताना बघून व्यावसायिकांची मोठी पंचायत झाली. दुकानातील सामान मोठ्या घाईगडबडीने त्यांना काढावे लागले. त्यामुळे व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली होती.


१० ते १५ वर्षांपासून होते वास्तव्य

चंद्रपूर गडचिरोली मुख्य रोडच्या बाजूला परिसरातील अनेक नागरिकांनी मागील दहा ते १५ वर्षांपूर्वी अतिक्रमण करुन छोटमोठे दुकाने थाटून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र आता वनविभागाने त्यांचे दुकाने हटविल्याने त्याच्या रोजगार हिरावला गेला आहे. आता आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos