राज्यातील नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना मिळणार बिनव्याजी कर्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. 
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळं पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3  लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयासंदर्भात बोलताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की,  1 ते 3 लाखापर्यंत पिक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.  यापूर्वी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत होते.  त्यावर 3 लाखापर्यंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना 3 टक्के व्याज भरावे लागत होते.  आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, असे ते म्हणाले. पाटील म्हणाले की, राज्यातील 45 लाख शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. यंदा सरकारने 60 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-06-10


Related Photos