महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील साडेसात लाख नागरिकांची होणार आरोग्य तपासणी


- माझे गाव आरोग्य सपंन्न गाव विशेष अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण याच्या मार्गदर्शनात १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या १०० दिवसाच्या कालावधीत माझे गाव आरोग्य संपन्न गाव विशेष अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान जिल्ह्यातील ७ लाख ५० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानास नागरिकांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ७ लाख ५० हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या दरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगाचे लवकर निदान करुन निरोगी कुटूंब निरोगी गाव आणि आरोग्य संपन्न जिल्ह्याचा संकल्प करण्यात आला आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव तसेच अन्य कारणांमुळे नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. निरोगी महराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणुन सदर अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या आजारांचे लवकर निदान करण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे.

मोहिमे दरम्यान ३० वर्षावरील ७ लक्ष ५० हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यात १ लाख ५१हजार १६२ रक्तदाब, ५७ हजार ५३८ मधुमेह तसेच कर्क रुग्णांमध्ये ८५६ मुखांचा, ४९७ स्तनाचे आणि २५९ गर्भाशय मुख कर्करुग्ण संख्या आहे. यासारख्या आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत सुरवातीच्या टप्प्यात  निदान झाल्यास त्यांचे संबंधित संस्थेकडे योग्यवेळी उपचार ही सुरु करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत ३० वर्षे व त्यावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये संशयित आढळणाऱ्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळचे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र किंवा संबंधित आरोग्य संस्थेत जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.





  Print






Related Photos