महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात ४ ते १८ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी


- कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) ची अंमलबजावणी; शस्त्रबंदी, परवानगीशिवाय मोर्चे-मिरवणुकांवर बंदी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(३) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी विविध प्रकारच्या कृतींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१) आणि (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा कोणत्याही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक पदार्थ, स्फोटके, दगड, क्षेपणास्त्रे किंवा त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा साठा करणे, बाळगणे अथवा तयार करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय व्यक्ती, प्रेत किंवा आकृत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा देणे, सभ्यता किंवा नीतिमत्तेला धक्का पोहोचेल अशी गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा चिथावणीखोर स्वरूपाची भाषणे करणे, हावभाव करणे, सोंग आणणे तसेच अशा प्रकारची चित्रे, फलक, चिन्हे किंवा अन्य साहित्य तयार करणे, प्रदर्शित करणे अथवा त्याचा प्रसार करणे यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर एकत्र येण्यास तसेच कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केलेले हे आदेश ४ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू राहणार असून, नागरिकांनी आदेशांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos