चोरीचे सोने खरेदी करणारा सराफा व्यापारी जेरबंद

- गुन्हे शाखेची कारवाई; वितळवून तयार केलेली अडीच लाखांची सोन्याची लगड जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सराईत चोरट्यांकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या उमरेड येथील एका सराफा व्यापाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप भास्कर गुंफलवार ३८ वर्षे रा. उमरेड असे अटक करण्यात आलेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सोन्याची वितळवून तयार केलेली सुमारे अडीच लाख रुपये किमतीची २२.१० मिलिग्रॅम सोन्याची लगड जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापनगर परिसरातील पीती मंगेश काटेकर यांच्या घरातून २१ मेच्या रात्री चोरट्यांनी १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांना चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती मिळाली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा परिसरात राहणारा सराईत चोरटा एक्का ऊर्फ टर्ष मटेंट रामटेके याने अर्जुन प्रभू सोलंकी २५ वर्षे रा. आराधनानगर, भांडेवाडी याच्या साथीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून उघड झाला चोरीच्या सोन्याचा व्यवहार -
पोलिसांनी अर्जुन सोलंकी याला अटक करून चौकशी केली असता, त्याने आणखी एका चोरीची माहिती दिली. आरोपींनी खामला परिसरातही चोरी केली होती. या दोन्ही चोरीतील सोने त्यांनी उमरेड येथील सराफा व्यापारी संदीप गुंफलवार याला विकल्याचे तपासात उघड झाले.
त्यानंतर पोलिसांनी सराफा व्यापारी गुंफलवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने चोरीचे सोने वितळवून त्याची लगड तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी ही सोन्याची लगड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
सराईत चोरटा एक्का फरार -
या प्रकरणातील मुख्य आरोपी एक्का ऊर्फ टर्ष मटेंट रामटेके हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरुद्ध नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. तो व्यसनाधीन असून, वेगवेगळ्या ठिकाणी ओयो हॉटेलमध्ये वास्तव्यास राहून चोरीचे गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
सध्या आरोपी एक्का फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या मध्यस्थांवरही पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले असून, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.
News - Nagpur




Petrol Price




