महत्वाच्या बातम्या

 वैरागड-आरमोरी मार्गावर धावत्या कारला भीषण आग : चालक बचावला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील नवीन ठाणेगाव परिसरात वैरागड-आरमोरी मार्गावर शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता धावत्या कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच वाहनाबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजरी (जि.गोंदिया) येथील चित्तरंजन गोपाल ठलाल यांच्या मालकीची कार वैरागडहून आरमोरीकडे येत होती. नवीन ठाणेगाव परिसरात पोहोचताच कारमधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीमुळे काही काळ वैरागड-आरमोरी मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos