महत्वाच्या बातम्या

 पुराच्या पाण्यात अडकलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची दोरखंडाच्या मदतीने सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून वारंवार दिला जात असतानाही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. असाच निष्काळजीपणाचा प्रकार आष्टी येथे घडला.

पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून कार नेण्याचा प्रयत्न एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. मात्र, सुदैवाने कार झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर प्रशासनाच्या पथकाने तत्परता दाखवत दोरखंडाच्या सहाय्याने संबंधित अधिकाऱ्याची सुखरूप सुटका केली.

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय देणारी ही घटना गुरुवारी आष्टी ते मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर घडली. मुलचेरा येथील पेडीगुडम वनपरिक्षेत्र कार्यालयात नुकतेच रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी अझहरूद्दीन पठाण हे आपल्या क्रेटा कारने आष्टीकडून मुलचेराच्या दिशेने जात होते.

रेंगेवाही नाल्याजवळ पोहोचल्यानंतर पुलावरून काही प्रमाणात पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, कार सहजपणे पाण्यातून पुढे जाईल, असा अंदाज त्यांनी बांधला. त्यामुळे त्यांनी कार पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने कारला जोरदार लोंढ्याने ओढले. पुराच्या प्रवाहासोबत वाहून आलेल्या मातीमुळे कार घसरत नदीच्या दिशेने जाऊ लागली.

या अनपेक्षित प्रकारामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी पठाण घाबरले. मात्र, काही क्षणातच त्यांची कार प्रवाहातील एका झाडाला अडकली आणि मोठा धोका टळला. प्रसंगावधान राखत त्यांनी तातडीने कारचे दार उघडले आणि कारच्या छतावर चढून मदतीसाठी संपर्क साधला. त्यांनी मुलचेरा तहसीलदारांना घटनेची माहिती दिली.

घटनास्थळ मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी पुराच्या पाण्यामुळे तेथे पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने आष्टी पोलिसांना मदतीसाठी रवाना करण्यात आले.

आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक, महसूल विभागाचे कर्मचारी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा जोर असतानाही बचाव पथकाने दोरखंडाच्या सहाय्याने कारजवळ पोहोचत वनपरिक्षेत्र अधिकारी अझहरूद्दीन पठाण यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुराच्या पाण्याचा अंदाज न घेता वाहन घेऊन जाणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पुराच्या प्रवाहातून मार्ग काढण्याचा धोका न पत्करण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos