महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात तिरंगा जन आक्रोश रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर शहरात शुक्रवारी दुपारी भव्य तिरंगा जन आक्रोश रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दिसून आला नाही. सर्व सहभागींच्या हातात केवळ राष्ट्रध्वज तिरंगा होता. त्यामुळे ही रॅली विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देणारी आणि पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन आयोजित करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहरातील शिवाजी महाराज चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनकर्त्यांनी रॅलीची सुरुवात केली. त्यानंतर दुचाकी रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत दीक्षाभूमी गाठली. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या दुचाकी रॅलीमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनीही तिरंगा हाती घेत आंदोलनात सहभाग नोंदविला.

रॅलीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई करावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या तिरंगा जन आक्रोश रॅलीने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत समाजातील विविध घटक एकवटल्याचे चित्र चंद्रपूर शहरात पाहायला मिळाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos